एकनाथ खडसे यांची अडचण वाढली, ईडीने बजावले समन्स

0
56

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज अखेर ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीसाठी खडसे यांना उद्या ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. (ED issued summons to Eknath Khadse)

एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीश चौधरी यांना आज ईडीने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्याच आली आहे. या दरम्यान चौधरी यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीला आता एकनाथ खडसे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. यामुळे ईडीने एकनाथ खडसे यांनी समन्स धाडले आहे.ईडीने समन्स बजावल्याबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. यामुळे खडसे उद्या ईडीच्या कार्यालयात हजर राहतील का याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. ज्या प्रकारे अनिल देशमुख यांनी ईडीकडून काही कागदपत्र मागवून ईडीकडून वेळ मागून घेतली होती, त्याच धर्तीवर एकनाथ खडसे हे देखील ईडीकडे वेळ मागण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणी गिरीश चौधरी यांची ईडीने १३ तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री त्यांना अटक केली. आता माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पूर्वी भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात चौकशी करण्यात आली होती. ईडीने त्यांना डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केला होता.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि सध्या अटकेत असलेले जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. अब्बास रसुलभाई उकानी हे या जमिनीचे मालक होते. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केल्यानंतर एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीची जमीन खडसे कुटुंबीयांच्या मालकीची झाली.

Source link