‘ईडी’चा फास अजित पवारांभोवती? मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई

0
40

मुंबई (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवार, दि. १ जुलै रोजी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर ‘ईडी’ने जप्तीची कारवाई केली. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून याप्रकरणी ‘ईडी’ने कारवाईला सुरुवात केली आहे. (ED’s trap around Ajit Pawar? Mama Rajendra Kumar Ghadge’s Jarandeshwar factory confiscated)

राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवल्याचा आरोप आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ‘ईडी’ने आपल्या कारवाईला सुरुवात केली. गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईनंतर ‘ईडी’ने गुरुवारी अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवारांह एकूण ६५ जणांना ‘क्लीन चीट’ दिली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात मागील वर्षी याबाबत अहवालदेखील सादर करण्यात आला होता. मात्र, या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिले होते. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी याबाबत याचिका दाखल केली होती.

२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे होती.