आनंदाचे डोही, आनंद तरंग! – सुनील म्हसकर सर 

0
35


 ठाणे (प्रतिनिधी: योगेश परदेशी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

सर्वात आनंदाची बाब अशी की, मला *AKS (Alert Knowledge Services) Worldwide Pvt. Ltd. या शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका विशाल समूहाकडून “Global Teacher Award 2020” हा जागतिक स्तरावर मानाचा असणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले आहे!

या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी जगातील 110 हून अधिक देशांतील शिक्षक सहभागी झाले होते, त्यांतील फक्त काहीं निवडक उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले आहे. आणि त्यात मलाही गौरविण्यात आले, याचा मला खूपच आनंद वाटत आहे! आणि मी करत असलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमानही वाटत आहे! दिल्ली येथे संपन्न होणारा भव्य पुरस्कार सोहळा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मात्र ऑनलाईन व्हर्च्युअल स्वरूपात पार पडला! या सन्मान सोहळ्यास जगातील 110 हून अधिक देशांतील शिक्षक उपस्थित होते! “श्रीरंग एज्युकेशन सोसायटी ठाणे” या संस्थेचे सचिव आदरणीय श्री. प्रमोद सावंत साहेब यांच्या शुभहस्ते आणि संचालक श्री.मधुकर देशपांडे साहेब आणि श्रीरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नितीन तावडे सर यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्वरूपात मला संस्थेच्या कार्यालयात सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले! 

“मानवातील उत्तम अंशाचा विकास घडवून त्यास उदात्ततेप्रत नेते तेच खरे शिक्षण! शिक्षणानेच माणूस समृद्ध व समाधानी होतो आणि तो इतरांची उन्नती साधू शकतो!” थोर विचारवंत रस्किन यांचे शिक्षणविषयक विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. या विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य एक हाडाचा, सच्चा शिक्षकच करत असतो! विद्यार्थ्यांत आधीच अस्तित्वात असलेल्या आत्मतत्त्वास जागृत करून त्यास महान व प्रखर बनविण्यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय मोलाची असते. आपले ईप्सित प्रामाणिक हेतूने पूर्ण करणारा एक निष्ठावंत शिक्षकच विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक वा बौद्धिक, भावनिक विकास घडवून आणू शकतो! शिक्षक हा उत्तम गुणांचा माणूस घडविणारा ‘ शिल्पकार ‘ असतो! विद्यार्थ्यांत नानाविध कौशल्य आणि तंत्र विकसित करणारा ‘ तंत्रज्ञ ‘ ही तोच असतो. तसेच जीवनरुपी प्रवासात विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करणारा जणू तो ‘ दीपस्तंभ’ च असतो! तर कधी प्रोत्साहित करणारा, धीर देणारा एक ‘ आधारस्तंभ’वा जीवलग मित्रही असतो.

अध्ययन- अध्यपनाचे व्रत स्वीकारलेल्या शिक्षकास अशा नानाविध भूमिका पार पाडाव्या लागतात! तर कधी काळानुरूप शिक्षण क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या परिवर्तनांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवावे लागते. शिक्षकास नेहमी आपला विद्यार्थी भविष्यात देशाचा दक्ष, सक्षम व सुजाण, सुसंस्कारित नागरिक म्हणून कसा घडेल, याचा ध्यास लागलेला पाहिजे! मला वाटते, असाच व्रतस्थ शिक्षक हा ‘आदर्श शिक्षक’ असतो! असो…. आज मला आपणांस सांगताना अतिशय आनंद होत आहे की, वर उल्लेख केलेल्या शिक्षकांच्या विविध गुणांपैकी काही गुण माझ्या सर्व गुरूंनी, माझ्या आईने माझ्या जीवलग मित्रांनी माझ्यात निर्माण केलेत आणि करत आहेत! माझ्याकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी माझी नेहमीच तळमळ असते. मी आजतागायत विद्यार्थ्यांना, युवकांना घडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करत आहे! समाजाचे व पर्यायाने देशाचे ऋण फेडण्यासाठी माझी प्रामाणिक धडपड चालूच असते.

1997 पासून मी स्वामी विवेकानंद संस्था, पाली या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून विविध स्पर्धा, शिबीर, प्रशिक्षण, उपक्रम, कार्यक्रम राबवून विद्यार्थी, खेळाडू व युवकांना घडविण्यासाठी निस्वार्थी वृत्तीने प्रयत्न करत आहे! विविध स्पर्धा, शिबीर, प्रशिक्षण, उपक्रम, कार्यक्रम यांतून सहभागी होत, मी मला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो! त्यात मला नेहमीच आनंद वाटतो. मोठयांचा आदर व छोटयांचा सन्मान करत विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी माझ्या मनात सदभावना असते. जीवनात नेहमीच अनेक अडचणी व कठीण प्रसंगांना न डगमगता, इतरांना दोष न देता, आनंदाने सामोरे जाण्यास मला अधिक बरे वाटते. इतरांचे चांगले व्हावे, भले व्हावे हेच चिंतन मी करत असतो! मला सतत चांगल्या विचार असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहण्यास आवडते! इतरांच्या चांगल्या गुणांची कदर करत मी माझ्यात चांगले गुण संचय करण्याचा सदैव प्रयत्न करत असतो! “मी विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थी आहेत तर मी व्यवस्थित आहे” ही भावना ठेवून मी अध्ययन- अध्यापनाचे कार्य अगदी निष्ठेने करत असतो! त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवत असतो. मला नेहमीच ज्ञान व कौशल्य यांनी अपडेट होण्यास आवडते! माझ्यावर कोणी एखादी जबाबदारी दिली तर ती उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी माझा अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न असतो! “वेष असावा बावळा, परी अंगी असाव्यात नाना कला” या संत रामदासांच्या उक्तीप्रमाणे मला माझ्यात विविध गुण अंगीकारण्यास आवडते. मला ग्रंथ व पुस्तके वाचण्याचा छंद आहे!

माझे स्वतःचे सुमारे 1000 हून अधिक पुस्तके असणारे एक छोटे ग्रंथालय आहे! गेली 25 वर्षे मी अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे सूत्रसंचालन व निवेदन करत आहे! मला अध्ययन-अध्यापन कार्य, काव्य, गीत, नाट्याभिनय, लेखनकार्य, वक्तृत्व, समाजसेवा, शेती, संशोधनकार्य, युवाकार्य, बागकाम व पाककृती यात विशेष आवड आहे! मला नेहमीच सद्भावना, सदाचार, सद्विचार, सत्संग आणि सत्य या “पंचसूत्री” नुसार जगण्यात एक वेगळाच आनंद वाटत असतो. माझ्या जीवन जगण्याची ती “पंचसूत्री” आहे. आणि म्हणूनच माझ्यातील याच गुणांची कदर करत, माझ्या कार्याची दखल घेऊन समाजातील विविध घटकांकडून आजतागायत 30 हून अधिक तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार व सन्मान तसेच 200 हून अधिक प्रमाणपत्र, पारितोषिक व बक्षिसे देवून माझा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे ! आणि त्यातच अधिक एक मानाचा तुरा रोवला गेला आहे! “Global Teacher Award 2020” या जागतिक स्तरावरील मानाचा असणाऱ्या “आदर्श शिक्षक पुरस्काराने” मला सन्मानित करण्यात आले आहे, याचा मला खूप खूप आनंद होत आहे!

मी नेहमीच लक्षात घेत असतो की “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.” सत्याच्या मार्गाने जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर परिश्रम घेतले तर त्याचे उचित फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही, याची प्रचितीही मला या निमित्ताने झाली आहे. त्यामुळेच माझी अवस्था “आनंदाचे डोही, आनंद तरंग” अशी झाली आहे! याचे सर्व श्रेय मी माझ्या “श्रीरंग एज्युकेशन सोसायटी ठाणे” या संस्थेला आणि संस्थेचे सचिव आदरणीय श्री. प्रमोद सावंत साहेब, संस्था अध्यक्ष आदरणीय श्री. मिलिंद बल्लाळ साहेब, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच श्रीरंग विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती शुभदा गोरे मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री. मुकुंद देशमुख सर आणि विद्यमान मुख्याध्यापक श्री.नितीन तावडे सर व माझे श्रीरंग विद्यालयाचे सर्व शिक्षक सहकारी यांस याचे श्रेय देऊ इच्छितो! त्याचप्रमाणे डोंबिवली येथील कै.पार्वतीबाई पुंडलिक पाटील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ.वंडार पाटील साहेब, माजी अध्यक्ष श्री. नकुल पाटील साहेब, (माजी सिडको अध्यक्ष) सचिव श्री.विठ्ठल पवार सर आणि विविधलक्षी विद्यालयाचे सर्व शिक्षक सहकारी यांसही तितकेच श्रेय जाते.

हा जो माझा सन्मान झाला आहे, त्यामागे माझे सर्व कुटुंब, माझे सर्व गुरुवर्य, माझे सर्व जीवलग मित्र, माझ्या स्वामी विवेकानंद या संस्थेचे माझे सर्व सहकारी या सर्वांचा त्यात सिंहाचा वाटा आहे! शिवाय, याचे सर्व श्रेय मी माझ्या हातून आजतागायत घडलेल्या आणि घडत असलेल्या “विद्यार्थी” या महत्वपूर्ण घटकास देतो! तसेच माझ्यासाठी नेहमीच वेळ काढून माझे असे संदेश वाचून मला मनःपूर्वक शुभेच्छा, प्रेरणा व आशीर्वाद देणारे आपणही माझ्या यशात मला मोलाचे वाटतात. त्याबाबत आपलेही मनःपूर्वक धन्यवाद.


आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.