Gopichand Padalkar: भाजपमध्ये गोपीचंद पडळकरांचे महत्त्व वाढले; इतर नेते अस्वस्थ – other leaders feeling uncomfortable as gopichand padalkar getting importance in bjp

0
19


हायलाइट्स:

  • गोपीचंद पडळकर यांचं भाजपमधील महत्त्व वाढलं
  • धनगर समाजाचे पक्षातील व मित्र पक्षांचे नेते अस्वस्थ
  • पडळकरांचा पवार काका-पुतण्यांविरोधात मोहरा म्हणून वापर

कोल्हापूर: राज्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने माजी खासदार विकास महात्मे आणि महायुतीतील माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) या नेत्यांना साईडट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. धनगर समाजाचा नेता म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांना (Gopichand Padalkar) प्रोजेक्ट करतानाच पवार काका-पुतण्यांविरोधात त्यांना मोहरा म्हणून वापरण्यात येत आहे. पडळकरांच्या या वाढत्या महत्त्वामुळे इतर नेते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

राज्यात धनगर होटबँक मोठी आहे. त्यांच्या मतासाठी नेहमीच प्रमुख पक्ष या समाजातील काही नेत्यांना ताकद देत असतात. राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे यांना दिलेले मंत्रीपद, भाजपने आत्तापर्यंत अण्णासाहेब डांगे, राम शिंदे, जानकरांना दिलेली मंत्रीपदाची संधी, गोपीचंद पडळकरांना दिलेली आमदारकी हे त्याचेच उदाहरण. प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, रामहरी रूपनर, अनिल गोटे, विकास महात्मे यांनाही वेळोवेळी विविध पक्षाकडून राजकीय सन्मान मिळाला. पण नेत्यांची ताकद कमी होताच बहुतेक पक्षांनी यातील अनेक नेत्यांना साईड ट्रॅकही केले. सध्या भाजपमध्येही तेच सुरू आहे. डांगे, शेंडगे, गोटे, शिंदे यांच्या पाठोपाठ आता जानकर आणि महात्मे यांचा नंबर लागला असल्याची चर्चा आहे. नानासाहेब सगरे, डांगे, शेंडगे यांना राष्ट्रवादीत हा अनुभव आलाच होता.

वाचा: आता चौकशांची लढाई! महाविकास आघाडी भाजपला देणार ‘जशास तसे’ उत्तर

धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवत भाजपने रासपला महायुतीत घेतले. जानकरांना कॅबिनेट मंत्री केले. आमदार होताना मात्र जानकरांनी कमळाचा शिक्का मारून घेण्यास नकार दिला. तिकीट वाटपात जादा जागांचा धरलेला आग्रह, विधानसभेत त्यांचा फारसा न झालेला उपयोग आणि त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे भाजपची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. महायुतीची सत्ता आल्यानंतर बरेच दिवस त्यांना मंत्रिपदासाठी ताटकळत ठेवले. सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे अधिकच दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

जानकरांना पर्याय म्हणून एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या दिग्गजांना डावलून पडळकरांना आमदार करण्यात आले. विधानसभेला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उतरवून राज्य पातळीवर हवा केली. पवार काका-पुतण्यांवर रोजच्या रोज तोफा डागत पडळकरही भाजपचे काम हलके करत आहेत. महाविकास आघाडीचा तंबू पवारांच्या प्रमुख खांबावर तग धरून आहे. तो खिळखिळा करण्यासाठी पवार कुंटुंबाला शक्य तेवढे बदनाम करणे हेच भाजपचे सध्याचे लक्ष्य आहे. या कामात पडळकरांनी आघाडी घेतल्याने ते सध्या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या रांगेत बसले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनातही पक्षाने पडळकरांना पुढे केले आहे. यावरून बरेच काही स्पष्ट होत आहे.

वाचा: साखर कारखान्यांची विक्री; अण्णा हजारेंचे खळबळजनक आरोप

पडळकरांचे महत्त्व वाढत असल्याने दुसरीकडे जानकर, महात्मे यांच्यासह इतर काही नेते अस्वस्थ झाले आहेत. विशेषता महादेव जानकर अधिक अस्वस्थ झाले आहेत. उत्तम जानकरांनी तर हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद देत धनगर समाजाला प्रतिनिधीत्व दिले. सक्षणा सलगर पक्षाच्या तोफा सांभाळत आहेत. यातून एकाच समाजातील विविध पक्षात विभागलेले नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. या सर्व लढाईत धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये व्हावा म्हणूनन जे आंदोलन सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समाज मात्र अस्वस्थ आहे.

सांगली जिल्ह्यात खासदार संजय पाटील आणि राज्यात थेट पवार काका पुतण्यांना अंगावर घेण्यात पडळकर कुठेच कमी पडत नसल्याने भाजपचे लक्ष्य सहज साध्य होत आहे. वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आल्या आल्या आमदारकीचे बक्षीस देत त्यांना ताकद देण्यात आली. रोज वादग्रस्त विधाने करत पडळकर सतत चर्चेत राहत आहेत. भाजपनेही त्यांना आवरण्याऐवजी मोकळीक दिल्यानेच त्यांचा ‘बोलविता धनी कोण’ हा प्रश्न इतर पक्षाकडून सतत विचारला जात आहे.

त्यांना मी का मोठा करू?

सोलापूर जिल्ह्यात पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता जानकर यांनी “त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे ते काही माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मग मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊन त्यांना कशाला मोठं करू?,’ अशी प्रतिक्रिया दिली. यावरून पडळकर यांच्यावर असलेला जानकर यांचा राग स्पष्ट होतो.

वाचा: ‘…तर आधी मला मुख्यमंत्री करा’; संभाजीराजेंच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!Source link