मान्सून झाला गायब पण, का? जाणून घ्या देशात कुठे अडकला मान्सून; वरुणराजा कधी येणार भेटीला

0
35

देशभरात सर्वत्र मॉन्सूनचे चांगली हजेरी लागण्याआधीच मॉन्सून रुसला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस अशा स्थितीतच मॉन्सूनला ब्रेक लागला आहे. त्यामुळेच देशात अनेक भागांमध्ये तापमान पुन्हा वाढले आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर १ जुलैला पारा ४३.५ अंशावर पोचला होता. ९ वर्षात पहिल्यांदाच दिल्लीत ऐन जुलै महिन्यात इतका उकाडा होतो आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा सर्वसाधारण तापमानापेक्षा ७ अंश वर आहे. एका बाजूला मॉन्सूनची पुरेशी हजेरी नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोना महामारीमुळे आधीच संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेसाठीदेखील मॉन्सून गायब झाल्याने चिंता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाचे (IMD)माजी महासंचालक के जे रमेश यांनी याबाबत विश्लेषण केले आहे. मॉन्सूनवर ब्रेक का लागला आहे, कधीपर्यत हा उकाडा आपल्याला सहन करावा लागेल आणि मॉन्सूनने घेतलेल्या या ब्रेकचा एकूणच पावसावर किती परिणाम होणार या प्रश्नांचे विश्लेषण जाणून घेऊया.

मान्सून झाला गायब पण, का? जाणून घ्या देशात कुठे अडकला मान्सून; वरुणराजा कधी येणार भेटीला

मॉन्सून ब्रेक काय असतो?
भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने मॉन्सूनचे असतात. याच कालावधीत मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे सर्व देशभर पाऊस पडतो. यालाच नैऋत्य मोसमी वारे असेही म्हणतात. अर्थात या ४ महिन्यांच्या काळात अनेकवेळा एक किंवा दोन आठवड्यांपर्यत पाऊसदेखील पडत नाही. यालाच मॉन्सून ब्रेक असे म्हणतात. म्हणजेच मॉन्सून काही काळासाठी ब्रेक घेतो. मॉन्सूनच्या या ब्रेकमागे अनेक कारणे असतात.

आताच्या मॉन्सून ब्रेकमागची कारणे काय?
मागील जवळपास दोन आठवड्यांपासून मॉन्सूनचे ढग पुढे सरकण्यावर ब्रेक लागला आहे. सध्या पश्चिमेकडून जोरदार आणि उष्ण वारे वाहत आहेत. हे वारे पूर्वेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांना अडवतात आणि त्यामुळेच मॉन्सूनचे वारे पुढे सरकण्यात अडथळे येत आहेत.

कधी अॅक्टिव्ह होणार मॉन्सून?
३० जूनपर्यत पूर्व राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि चंदीगढ यांच्या काही भागांना सोडून देशभर मॉन्सून पसरला आहे. अर्थात दोन आठवड्यापासून मॉन्सून बाडमेर, भीलवाडा, धौलपूर, अलीगढ, मेरठ, अंबाला आणि अमृतसर या भागात अडकला आहे. सर्वसाधारणपणे ८ जुलैपर्यत मॉन्सून सर्व देशभर पोचतो. मात्र यावेळेस यासाठी एक आठवडा अधिक लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार जूनमध्ये देशभर १६७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यावेळेस १८३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच मॉन्सूनच्या पहिल्या महिन्यात सरासरीपेक्षा १०० टक्के अधिक पाऊस झाला आहे. देशातील उर्वरित भागाच्या तुलनेत मध्य भारतात १७ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

यावर्षी पावसाळा कसा असणार?
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशात ९०७ मिलीमीटर पाऊस होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच संपूर्ण देशभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात मॉन्सूनच्या ४ महिन्यांचच्या काळात सरासरी ८८०.६ मिलीमीटर पाऊस पडतो. याला लॉंग पिरियड अॅव्हरेज असे म्हणतात. म्हणजेच भारतात ८८०.६ मिलीमीटर पावसाला १०० टक्के पाऊस मानण्यात येते. यावर्षी ९०७ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्याच्या ब्रेकचा पावसाळ्यावर काय परिणाम होणार ?
सध्याच्या ब्रेकचा संपूर्ण पावसाळ्यावर बहुदा काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. संपूर्ण भारतात जून महिन्यात सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. हवामान विभागाने जुलै महिन्यात २७७ मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. जुलै महिन्याच्या सुरूवातीच्या १० दिवसांत जरी मॉन्सून रुसलेला राहिला तरी उर्वरित २० दिवसात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मात्र जर १० दिवसांनंतरदेखील मॉन्सून सक्रिय झाला नाही तर मात्र त्याचा सरळ सरळ विपरित परिणाम पिकांवर दिसून येईल.