दारु विक्रेत्याकडून लाच घेणाऱ्या पोलिसासह होमगार्डाला अटक

0
38

जळगाव : एका गुन्ह्यातील वॉरंटमध्ये मदत करणे तसंच अवैध दारु विक्री संदर्भात कारवाई न करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना पाळधी दूरक्षेत्रचा पोलिस नाईक व होमगार्ड यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं आणि अटक केली आहे. पाळधी दूरक्षेत्र येथील पोलिस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (वय ३७, रा. पिंप्राळा) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे, (वय २५,) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही लाचखोरांची नावे आहेत.

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा दारु विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच या व्यक्तीच्या विरोधात याआधी एक गुन्हा दाखल आहे. त्याचे वॉरंट निघाले आहे. त्याचा तपास सपकाळे याच्याकडे होता. या वॉरंटमध्ये मदत करण्यासाठी तसेच दारु विक्रीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात सपकाळे याने बुधवारी अडीच हजार रुपयांची लाच मागितली.

संबधित व्यक्तीस लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या पथकाने पाळधी दूरक्षेत्र येथे सापळा रचला होता.

पोलिस नाईक सपकाळे व होमगार्ड सोनवणे यांनी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी पथकातील एका कर्मचाऱ्यास फोन करुन ‘काम झाले आहे, मी येतो’असा निरोप दिला. यानंतर लागलीच पथकाने दूरक्षेत्रमध्ये येऊन दोघांना रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link