मराठा आरक्षणासाठी भाजपची महत्त्वाची बैठक

0
28

नाशिक (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल यानंतर मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून मराठा आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी भाजपचे बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

इतकंच नाही तर मराठा बांधवांच्या भावना समजून घेण्यासाठी ही बैठक घेतली असून राज्यभरातील समाजबांधवांना बोलवण्यात आले असल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली. बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, ‘आरक्षणवरून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असं मी आवाहन केलं होतं. विनायक मेटे, संभाजी महाराज यांना देखील आम्ही एकत्र आणणार आहोत.’ असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात 23 संघटना काम करत असताना वेगळी भूमिका का? असाही सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी संभाजीराजे यांच्याविषयीदेखील वक्तव्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर नेतृत्व कोणीही करावं, पण समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणार आहे. माझी समनव्याची भूमिका आहे. संभाजी महाराजांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती करणार आहे. सगळे एकत्र येऊन आठवड्या भरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असावं असं विखे पाटील म्हणाले.

पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्दयावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. समाजातील आमदार खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं.