परदेशी प्रसारमाध्यमांचा अपप्रचार खोडून काढण्यास प्रारंभ; केंद्र सरकारची विशेष व्यवस्था कार्यान्वित

0
22

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

भारतात करोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर परदेशी प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला. मात्र, केंद्र सरकारने तो अपप्रचार खोडून काढण्यासाठी विशेष व्यवस्था कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये संबंधित देशांच्या राजदूतांना खरी माहिती पाठविणे आणि त्यांनी संबंधित प्रसारमाध्यमांना त्याची जाणीव करून देणे याचा समावेश आहे. या व्यवस्थेमुळे परदेशी प्रसारमाध्यमांच्या अपप्रचारास चाप बसण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
 
 
 
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर अव्यवस्था निर्माण झाली आहे, मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असून बळींचा आकडाही लपविला जात आहे अशा प्रकारचा प्रचार परदेशी प्रामुख्याने ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये बहुतांशी वृत्तांमध्ये अतिरंजित आणि खोटी माहिती असल्याचेही सिद्ध झाले आहे. मात्र, या प्रकाराची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण आणि परराष्ट्र मंत्रालयाने समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
 
 
 
त्याविषयी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, भारतविरोधी प्रचार जगातील मोजक्याच देशांमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यामध्ये ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आघाडीवर होती. मात्र, हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्रितपणे व्यवस्था कार्यान्वित सुरू केली आहे. त्यामध्ये विविध देशांमधील भारतीय राजदूतांचा आणि दूतावासांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय राजदूतांना त्या त्या देशांमधील प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांची भेट घेण्यास सांगून भारतातील परिस्थितीविषयी खरी माहिती त्यांना देण्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
  
या व्यवस्थेचा अतिशय सकारात्मक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली आहे. बहुतांशी प्रसारमाध्यमांनी आता अतिरंजित आणि खोटे वार्तांकन थांबविले आहे. अनेकांनी यापूर्वी केलेल ट्विटही डिलीट केल्याचे दिसून आले आहे.
 
 
 
अपप्रचार खोडून काढण्यात भाजपचाही पुढाकार
 
 
 
परदेशातील प्रसारमाध्यमांचा अपप्रचार थांबविण्यासाठी भाजपच्या परराष्ट्रविषयक विभागानेही पुढाकार घेतल्याचे समजते. भाजपशी जोडल्या गेलेल्या संबंधित देशातील भारतीय अथवा भारतीय वंशाच्या नागरिकांना येथून खरी आणि नेमकी परिस्थिती मांडणारी माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा वापर करून संबंधित लोक तेथील वृत्तपत्रांकडे वाचकांची पत्रे या सदराद्वारे चुकीचे वार्तांकन केले जात असल्याचे पुराव्यानिशी सांगत आहेत. त्याचाही अतिशय सकारात्मक परिणाम होत आहे.