Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'डेल्टा प्लस'चा किती धोका?; राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चा किती धोका?; राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले असून डेल्टा प्लसची लागण अद्याप एकाही लहान मुलास झालेली नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ( Delta Plus Variant In Maharashtra Latest Update )

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच करोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे एकाचवेळी २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून महाराष्ट्राला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राजेश टोपे यांनी आज राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांबाबत सद्यस्थिती मांडली.

‘राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटमुळे शरिरातील अँटिबॉडिज कमी होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या तरी आम्ही सर्व २१ रुग्णांना विलगीकरणात ठेवले आहे. या रुग्णांची सर्व माहिती घेतली जात आहे. ट्रॅव्हल हिस्ट्री जाणून घेताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे. यापैकी कुणी लस घेतली आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे’, असे टोपे यांनी नमूद केले. जीनोमिक सीक्वेन्स स्टडी साठी नमुने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्हेरिएंटची लागण होऊन अद्याप एकही मृत्यू झालेला नाही तर काही रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या व्हेरिएंटची लक्षणे आणि त्यावरील उपचार सारखेच आहेत, असे नमूद करताना लहान मुलांना या व्हेरिएंटची लागण झालेली नाही, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांचे प्रमाण सध्या कमी असले तरी संक्रमणाचा दर जास्त असू शकतो. त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४०० नमुने पाठवले गेले असून त्यात २१ रुग्णांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे आढळले आहे. हे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसले तरी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ती बाळगली जात असून नव्या व्हेरिएंटबाबतची सर्व माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात येत आहे, असे टोपे म्हणाले.

Source link

महाराष्ट्रात 'डेल्टा प्लस'चा किती धोका?; राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News