Pune: जीएसटी वाचवण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्याने लढवलेली शक्कल पडली महागात

0
35

पुणे, 24 जून: वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) भरण्यापासून अनेक व्यापारी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. असाच प्रकार करणं पुण्यातील व्यापाऱ्याला (Pune Businessman) चांगलेच महागात पडले आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाराने तब्बल 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

राज्यातील जीएसटीच्या पुणे विभागाने 22 जून रोजी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. जीएसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश तिरथदास सचदेव यांनी मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी त्याच्या स्वतःच्या नावे तसेच मे. ट्रेडर्स भावरे, में. प्रकाश ट्रेडर्स, में. अगरवाल इंटरप्रायजेस, में. कोल्हे सेल्स, में. किरण ट्रेडिंग कंपनी, में. नारायण ट्रेडर्स, में. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड में सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या इतर व्यक्तीच्या नावे स्थापन करून वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 अंतर्गत नोंदणी दाखले घेतले.

या कंपन्यांच्या माध्यमातून ओमप्रकाश यांनी तब्बल 130.05 कोटी रुपयांची खोटी देयके देत 19.79 कोटोींचा इनपुट टॅक्स क्रेडिट खरेदीदारांना दिला. तसेच हा कर आपल्याला भरावा लागू नये म्हणून बोगस कंपन्यांमार्फत कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठयाशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे 22.48 कोटी रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला.

अशाच प्रकारे इतरही काही व्यापारी कर चुकवण्यासाठी बोगस कंपन्यांमार्फत बिल तयार करत असल्याची माहिती जीएसटी विभागाला मिळाली आहे. या व्यापाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. जीएसटी विभागाने ओमप्रकाश तिरथदास सतदेव यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Source link