नवी दिल्ली : भारत सरकारच्या कठोरपणापुढे अखेरीस नमते घेत ट्वीटरने विनय प्रकाश यांची भारतातील रेसिडेंट ग्रिवान्स ऑफिसर (निवासी तक्रारनिवारण अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ट्वीटर भारताच्या नव्या आय टी नियमांपुढे झुकले असल्याचे दिसत आहे.
ट्वीटरने स्वतःच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. विनय प्रकाश यांना निवासी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ट्वीटरचे वापरकर्ते त्यांच्याशी इमेलद्वारे संपर्क साधू शकतात असे सांगण्यात आले आहे. ट्वीटरने स्वतःचा पत्ता देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. ट्वीटरसोबत खालील पत्त्यावर संपर्क केला जाऊ शकेल. त्यासाठी ट्वीटरचा देण्यात आलेला पत्ता ‘४था मजला, द इस्टेट, १२१ डिकन्सन रोड, बंगळूरू ५६००४२’ हा आहे.
ट्वीटरच्या जागतिक पातळीवरील कायदेशीर धोरणे अधिकारी जेरेमी केसल यांच्या सोबत प्रकाश यांचे नाव झळकत आहे. जेरेमी हे अमेरिकेत स्थित आहेत.
या बरोबरच कंपनीने २६ मे २०२१ पासून २५ जून २०२१ अनुपालन अहवाल (कॉम्प्लायन्स रिपोर्ट) देखील प्रसिद्ध केला आहे. २६ मे रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या आयटी कायद्यांतर्गत ही एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी ट्वीटरने धर्मेंद्र चतुर यांची याच पदावर नियुक्ती केली होती. त्यांची निवड अंतरिम अधिकारी म्हणून झाली होती. परंतु गेल्या महिन्यात त्यांनी या पदाचा राजिनामा दिला होता.