Home पुणे आता आपल्या आई-बापांसाठी राग दाखवा, दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप

आता आपल्या आई-बापांसाठी राग दाखवा, दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप

0
आता आपल्या आई-बापांसाठी राग  दाखवा, दुर्घटनेनंतर प्रविण तरडेंचा संताप
पुणे, 8 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पुण्यातील मुळशी तालुक्यातील (Mulshi Teshsil Pune) केमिकल कंपनीला सोमवारी (7 जून 2021) लागलेल्या आगीत 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू (18 workers died in Chemical Factory fire) झाला. मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या केमिकल कंपनीला लागलेल्या या आगीनंतर घटनास्थळी अभिनेते प्रविण तरडे (Actor Pravin Tarde) यांनी भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी घटनास्थळाचे दृश्य पाहून प्रविण तरडे हे सुद्धा संतापले. कंपनीत एका छोट्याशा जागेत 38 माणसांना काम करावे लागत असल्याचं पाहून प्रविण तरडे यांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व नागरिक, सरपंच यांना कंपन्यांना भेट देऊन पाहणी करण्याचीही विनंती केली आहे.

आपण हा तमाशा पाहत बसायचा का?

प्रविण तरडे म्हणाले, “आपण एक काम करू आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. आता कंपनी लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. प्रत्येक मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला मी विनंती करतो जा कंपन्यांच्या आत आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करत आहेत. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरानी, वर्षानी आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?”

40 बाय 40च्या ठोकळ्यात केमिकल मशीन 38 माणसं कामाला?

प्रविण तरडे म्हणाले, “तर प्रत्येक जबाबदार व्यक्ती असेल त्याने मी तर जातोच आहे आता… इथं शेजारच्या कंपनीत मी नोकरीला होतो. प्राज इंडस्ट्रीजमध्ये 3 वर्षे मी कामाला होतो. या कंपन्यांचं फॅक्ट्री ले आऊट चांगलं आहे मग त्यांच्या शेजारी लागून असलेल्या कंपन्यांत ही व्यवस्था का नाही. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 38 माणसं काम करतात का कधी? म्हणजे 20 माणसं वाचली यात आनंद मानायचा की दुर्दैव करायचं. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 38 माणसं कामाला.”

प्रशासनावर, शासनावर अवलंबून राहू नका

तक्रार कोणाचीही नाहीये, जबाबदारी लोकांची आहे. प्रशासनावर, शासनावर अवलंबून राहू नका. आपले नातेवाईक तिथं काम करतात ना? आता आपली जबाबदारी आहे… आपण आतमध्ये जायचं कंपनीच्या आणि आपले आई-बाप कसे काम करतात ते पाहा. पोरांनो विनंती करतो आपण आपली तालुक्याची रग दाखवतो ना? दहा ठिकाणी आपली रग माहिती आहे जगाला. तर आता आपली रग आपल्या आई-बापांसाठी दाखवा. कंपन्यांच्या आत जाऊन पाहा. आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या चांगल्या दर्जाच्या आहेत तिथे या छोट्या-छोट्या मालकांना न्या आणि दाखवा हे पहा कसं आहे असंही प्रविण तरडेंनी म्हटलं आहे.

जगातील इतक्या मोठ्या MIDCतील व्यवस्था सुद्धा पाहायला हवी

अपघात सर्व ठिकाणी होतात हो औद्योगिक क्षेत्रात पण झाल्यावर माणसं वाचली पाहिजेत. अग्निशमन दलाची माणसं आली तेव्हा जागा नव्हती. जगातील इतक्या मोठ्या एमआयडीसीतील अग्निशमन दलाची सुद्धा पाहणी केली पाहिजे चेक केलं पाहिजे, किती मोठं आहे त्यांना किती संधी दिली आहे. ती मंडळी इथे आली होती पण त्यांना लोकांना वाचवता आलं नाही असंही प्रविण तरडे म्हणाले.

Published by:
Sunil Desale

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here