
कोल्हापूरः करोनाचा कहर कायम असलेल्या आणि १६ टक्के हा पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी कोल्हापूरकरांना निर्बंध अधिक कठोर करावे लागतील, असा इशारा दिला आहे.
‘निर्बंधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कोल्हापूरात आहे. यामुळं निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. जर कोणी नियम पाळले नाही तर निर्बंध अधिक कठोर केले जातील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. तसंच, आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागेल,’ असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
‘महाराष्ट्रात सध्या दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात प्रमाण जास्त आहे. कोल्हापूरने पहिल्या लाटेत काम उत्तम केलं. पण सध्या करोना आटोक्यात नाही त्याची काय कारणं आहेत. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींसोबतही चर्चादेखील केली. गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे यावर भर दिला. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आलं आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रेट नुसार कोल्हापुरात करोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील करोना रुग्ण कमी करण्यासाठी कोल्हापूरांनी सहकार्य करावे. कोल्हापुरात मोठ्या संख्येने रुग्ण संख्या असणाऱ्या गावात सर्वांच्या चाचणी करण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे. शिवाय लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्र वाढविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.