पुणे, 11 जून: पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Cm Ajit Pawar)यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आषाढी वारीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली.10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. (Pandharpur Ashadi Wari 2021)
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी वारीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ 10 मानाच्या पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असं दहा पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील.
वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. अशातच गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.