मुंबई : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पाण्याखाली तुंबली. नालेसफाईची कामं हाती घेतल्यामुळे मुंबई यंदा तुंबणार नाही असं शिवसेनेनं म्हटलं होतं. तरीसुद्धा पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली. यामुळे विरोधकांनी मात्र, शिवसेनेला चांगलंच टार्गेट केलं आहे. यावर अमृता फडणवीस यांनीदेखील एक शायरी करत शिवसेनेला टोला लगावला आहे.
‘जी तोंडापर्यंत उडत होती ती आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीने देखील आपली नियत बदलली’ अशा आशयाचं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलं आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे.
अमृता फडणवीसांनी ट्वीट करताना लिहलं की, ‘जो मुँह तक उड़ रही थी, अब लिपटी है पाँव से, बारिश क्या हुई मिट्टी की फ़ितरत बदल गई ….’ खरंतर, पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्यामुळे विरोधकांनी सेनेला टार्गेट केलं आहे. नालेसफाईच्या नावाखाली सेनेकडून हातसफाई झाली. त्यामुळे मुंबईत पुन्हा पाणी साचलं अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
(मी कुणाला बांधील नाही!; महादेव जानकरांच्या मनात चाललंय काय?)
दरम्यान, मुंबईत आणि उपनगरात आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे.
हिंदमाता जलमय
दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास पाणी साचून नागरिकांची प्रचंड गैरसोय होणाऱ्या सखल भागांपैकी एक म्हणजे हिंदमाता परिसर. या पावसातही हिंदमाता परिसरात प्रथेप्रमाणे जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक वाहनांमध्ये पाणी शिरल्यानं वाहनंही बंद झाली आहेत.
(मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर)