बँकेचा कॅशियरच निघाला ATM चोरीचा ‘मास्टर माईंड’ ; चप्पलमुळे उघडकीस आला गुन्हा

0
170

पिंपरी (प्रतिनिधी) – एका एटीएममध्ये बनावट चावीच्या सहाय्याने चोरी झाली. पोलिसांनी सर्व कसब पणाला लावत तीन आरोपी पकडले. परंतु हस्तगत रक्‍कम आणि चोरी गेलेली रक्‍कम याचा ताळमेळ बसेना, म्हणून पोलिसांनी आणखी जोर लावला असता दहा लाखांहून अधिक रक्‍कमेचा अपहार लपविण्यासाठी बॅंकेतील कॅशियरनेच ही चोरी घडवून आणल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हा गुन्हा केवळ चप्पलमधील साम्य पाहून उघडकीस आणला आहे.

सचिन शिवाजी सुर्वे, रोहित महादेव गुंजाळ (रा. पिंपरी), आनंद चंद्रकांत मोरे (रा. पिंपरी), रोहित काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीत सेवा विकास बॅंकेचे एटीएम आहे. शनिवारी मध्यरात्री दोन चोरट्यांनी एटीएम उघडून त्यातील रक्कम चोरून नेली.

एटीएम फोडण्याच्या पद्धतीवरून बॅंकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. त्यात बॅंकेचा शिपाई रोहित गुंजाळवर पोलिसांना संशय आला. 

गुंजाळ याचा मोबाइल तपासत असताना मोबाइलच्या गॅलरीत एक फोटो दिसला. त्या फोटोतील व्यक्‍ती आणि सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्‍ती आणि त्याच्या चप्पलमध्ये साम्य आढळून आले. तो आरोपी म्हणजेच आनंद मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या वाटणीला आलेले दोन लाख 70 हजार रुपये काढून दिले. 

त्यानंतर पोलिसांनी तडीपार आरोपी सचिन सुर्वेला देखील अटक केली. या दोघांनीच प्रत्यक्षपणे चोरी केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी त्याच्या वाटणीला आलेले दोन लाख 70 हजार रुपये काढून दिले. मात्र एटीएममधून 15 लाख 42 हजार रुपये चोरी झाल्याचे सांगण्यात आले होते. उर्वरित रक्‍कमेसाठी पोलिसांनी पुन्हा तपास वेगवान केला असता मुख्य सूत्रधार आणि धक्‍कदायक माहिती उघड झाली. 

रोहित काटे याने मागील एक वर्षापासून 10 लाख 80 हजार एवढी कॅश एटीएममध्ये न भरता त्या रकमेचा अपहार केला होती. त्यानंतर ती रक्कम त्याने 22 जुलै 2021 रोजी एटीएममध्ये चलनाद्वारे जमा केल्याचे काटे याने कागदी घोडे नाचवले होते. बॅंकेचा शिपाई रोहित गुंजाळ आणि कॅशियर रोहित काटे यांनी अर्धी रक्कम घेण्याच्या अटीवर एटीएम मशीनचा पासवर्ड आणि एटीएम मशीनची बनावट चावी दुसऱ्या दोन आरोपींना दिली.

भोसरी पोलिसांनी कॅशियर रोहित काटे, शिपाई रोहित गुंजाळ, आनंद मोरे या तिघांना अटक केली. तर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी तडीपार आरोपी सचिन सुर्वे याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक करत रोख रक्कम तीन लाख 57 हजार आणि गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

Source link