मुंबई (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन
मुख्यमंत्री चिपळूण येथील पूरग्रस्त भागाचा पहाणी दौरा करण्यासाठी गेले होते. हा पहाणी दौरा सुरु असतानाच ते ज्या व्यापारीपोठेने जात होते त्यावेळी एका पूरग्रस्त महिलेने अत्यंत पोटतिडिकीने आक्रोश करत मुख्यमंत्र्यांसमोर मदतीसाठी टाहो फोडला होता. सेनेचे आमदार भास्कर जाधव व त्या व्यापाऱ्यांचा व्हीडीओ (video) काल खूप व्हायरल (Viral) झाला. त्या व्हीडीओमध्ये त्या महीलेने खासदार, आमदारांचे दोन महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते. (Big decision of BJP corporators: One month’s salary for flood victims)
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP Group leader) यांनी जाहीर केला आहे. याबाबतचे लेखी पत्र महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे.
राज्यात झालेल्या आणि सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना पुन्हा उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत.
मात्र अजूनपर्यंत शासनाने यासाठी कोणती मदत जाहीर केली नाही. हिच संधी साधत भाजपाने मात्र आपल्या नगरसेवकांचे मानधन पुरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबतची माहिती भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले.