कोल्हापूर : ‘स्वयंघोषित चाणक्य, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आता राजकारणासाठी भाडोत्री चाणक्याची मदत लागत आहे, यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट होत असून त्यांचा राजकीय अस्त आता जवळ आला आहे’, अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Attacks NCP Sharad Pawar) यांनी कोल्हापुरात केली आहे. काका पुतण्यांच्या तालावर राज्यातील काँग्रेसचे नेते केवळ माना डोलवतात, त्यांचे या दोघांपुढे काहीच चालत नाही, असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.
पडळकर यांनी सांगली व कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या या पत्रकार बैठकीत त्यांनी पवार काका पुतण्यावर जोरदार निशाणा साधला.
‘पवारांचे राजकारण बिनबुडाच्या विचारांवर आधारित’
शरद पवार आणि भाडोत्री चाणक्य प्रशांत किशोर यांच्यामध्ये कितीही चर्चा, भेटी होऊ द्या. त्यांच्या भेटीचा राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. कारण पवार यांचे राजकारण हे बिनबुडाच्या विचारावर आधारित आहे. जातीधर्मात तेढ निर्माण करुन पै-पाहुण्यांची राजकीय सोय लावायची हे पवार ‘काका-पुतण्यां’चे राजकारण महाराष्ट्रातील नागरिक ओळखून आहेत, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात सध्या काका पुतण्यांचीच मनमानी सुरू आहे. काँग्रेसचे नेते केवळ त्यांच्यापुढे माना डोलवण्याचे काम करतात. पदोन्नती नाकारल्यास राजीनामा देतो म्हणणारे मंत्री नितीन राऊत नंतर आपली भूमिका बदलतात. यावरून त्यांना केवळ सत्ता महत्त्वाची आहे. आरक्षण, पदोन्नती या गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम असल्याचे दिसते. काँग्रेस, सेना व राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नाचे काही देणेघेणं राहिले नाही, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.
चक्काजाम आंदोलनाची घोषणा
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सामाजिक समीकरण बिघडवण्याचे पाप केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी बाजू भक्कमपणे मांडली नाही. मराठा समाजाच्या ताटात माती टाकण्याचं पाप केले आहे. दुसरीकडे राज्यातील राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील आरक्षण संपुष्टात आले. ही मंडळी भविष्यात ओबीसींचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणही संपवतील. यामुळे या सरकारच्या विरोधात २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन होत आहे,’ अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ओबीसी सेलचे प्रमुख संदीप कुंभार हेदेखील उपस्थित होते.