
शिवसेनेचे मुंबईतील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या लेटरबॉम्बची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्रास दिल्याची अशीच एक तक्रार शिवसेनेचे अहमदनगरमधील मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी केली आहे. ‘राज्यात भाजपची सत्ता असताना मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देण्यात आला होता. मात्र, म्हणून शिवसेनेने भाजपशी जुळवून घेण्याची मागणी गडाख यांना मान्य नाही,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
गडाख उस्मानाबादचे पालकमंत्री आहेत. उस्मानाबादमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना गडाख म्हणाले, ‘भाजपच्या सत्ताकाळात तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना आणि भाजपकडेच गृहमंत्रीपद असताना आपल्या कुटुंबालाही त्रास झाला होता. तेव्हा मी आमदार नव्हतो. पूर्वी एका शेतकरी आंदोलनाच्या वेळी गुन्हा दाखल झाला होता. ते प्रकरण न्यायालयात सुरू झाल्यानंतर न्यायालयाकडून समन्स मिळालेले नव्हते, त्यामुळे न्यायालयात हजर होऊ शकलो नव्हतो. त्यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा पाठवून आपल्या घराची झडती घेतली. याचा आपल्याला आणि कुटुंबीयांनाही खूप त्रास झाला. सरनाईक यांचे कुटुंबही सध्या अशाच त्रासातून जात आहे. त्यामुळे त्यांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. ज्यांना त्रास होतोय, ते लोक आता बोलून लागले आहेत. मात्र, यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे, याच्याशी अपण सहमत नाही. राज्यातील महाविकास आघाडी ही तीन पक्षांची मिळून किमान समान कार्यक्रमांवर आधारित स्थापन झालेली आहे. या तिन्ही पक्षांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना होणारा त्रास थांबिविण्यासाठी एकत्र येऊन काही तरी उपाय केला पाहिजे. महाविकास आघाडीचे नेते नक्की यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे,’ असेही गडाख म्हणाले.
काय घडले होते त्यावेळी
नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथे गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन झाले होते. त्यामध्ये गडाख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टात हे प्रकरण सुरू झाले. त्यामध्ये गडाख यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. १६ मार्च २०१९ रोजी गडाख यांना कोर्टात हजर करावे, असा आदेश कोर्टाने दिला. हे वॉरंट बजावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पवार मोठ्या फौजफाट्यासह गडाख यांच्या नगरमधील निवासस्थानी गेले. शंकरराव गडाख घरी नसून पुण्याला गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हेही तेथेच होते. सुमारे २० ते २५ पोलिसांनी घरी येऊन झडती घेतली. प्रत्येक खोली तपासली. नेवाशाचे तत्कालीन भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी हा त्रास दिल्याचा आरोप त्यावेळी गडाख कुटुंबीयांनी केला होता. गडाख तेव्हा शिवसेनेत नव्हते आणि आमदारही नव्हते.