नागपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर अधिक आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. आज भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची आमच्याशी युती होती. मात्र शिवसेनेची छुपी युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होती. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे असे सांगतानाच शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. (bjp leader chandrasekhar bavankule said that we will eliminate shiv sena in maharashtra)
त्यावेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा घेतला आणि या फायद्याचसाठी शिवसेना आमच्यासोबत होती, असा आरोपही बावनकुळे यांनी शिवसेनेवर केला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांची विचारधाराही वेगळी आहे. मात्र त्यांनी कोणासोबत युती करायची हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या महिन्यांआधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली होती आणि हे मी जाणीवपूर्वक सांगतो, असे बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या लोकांमधील करिश्म्याचा वापर करायचा आणि अधिकाधिक जागा जिंकून पळून जायचे हे शिवसेनेचे धोरण होते. मातोश्रीचे दरवाजे भाजपला बंद हे शिवसेनेने पूर्वीच ठरवून टाकले होते. तसा अजेंडाच त्यांनी तयार करून ठेवला होता, असे सांगतानाच शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपी युती होती आता ती त्यांनी उघडपणे केलेली आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने कोणाशीही युती केली तरी आम्हाला मात्र काही फरक पडत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
शिवसेनेला जनता आता उभे करणार नाही- बावनकुळे
शिवसेनेवर टीका करत असताना बावनकुळे यांनी शिवसेनेचा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असा उल्लेख केला. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे ते म्हणाले. शिवसेनेने महाराष्ट्राचे वाटोळे केल्यामुळे जनता आता शिवसेनेला उभे करणार नाही,असेही ते म्हणाले. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असली तरी देखील आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.