मुंबई: अँटिलिया स्फोटके प्रकरण (Antilia Case) आणि मनसूख हिरनमृत्यूप्रकरणी (Mansukh Hiren Death Case) एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. हे टीकास्त्र सुरू झालेले असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणातील सर्वांचे गॉडफादर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. (bjp mla nitesh rane made serious allegations against chief minister uddhav thackeray)
नितेश राणे यांनी ट्विट करत हा गंभीर आरोप केला आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरण असो किंवा मग मनसुख हिरन प्रकरण असो, या प्रकरणांमध्ये अटक होणारा किंवा मग त्या प्रकरणात ज्याची चौकशी होते ती प्रत्येक व्यक्ती ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शिवसेनेशीच कशी संबंधित असते?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. असे असतानाही आपण विचार करत आहोत की याचा गॉदफादर कोण असावा?… तो गॉडफादर दुसरा तिसरा कोणी नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरी काल गुरुवारी सकाळी सहा वाजता एनआयएने मनसुख हिरन हत्या प्रकरणी छापा टाकला. त्यानंतर दुपारी प्रदीप शर्मा यांना अटक झाली. प्रदीप शर्मा यांना २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या कारवाईनंतर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एका कारमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्यानंतर त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ४ जणांचा अटक करण्यात आली आहे. या ४ जणांमध्ये तीन पोलिस आहेत.