मुंबई : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
करोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने लॉकडाउनचे निर्बंध कमी केले असून, मुंबईतही काही अंशी सूट मिळाली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तिसऱ्या गटात समावेश असलेल्या मुंबईतही कमी निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईत दुकाने, हॉटेल दुपारी ४पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार-रविवारसह सायंकाळ ५नंतरची संचारबंदी कायम असेल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सातही दिवस आणि २४ तास सुरू ठेवण्याची अनुमती कायम आहे. सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग, मॉर्निंग वॉकसाठी पहाटे ५ ते सकाळी ९पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, लग्नकार्यासाठीची दोन तासांची अट रद्द केली असून, ५० जणांच्या उपस्थितीस मुभा असेल.
मुंबई पालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार गर्दीवर अंकुश आणण्यासाठी शनिवार-रविवार आणि सायंकाळी ५नंतर संचारबंदी कायम राहील. मॉल, थिएटर, नाट्यगृहे सुरू बंदच राहतील. शनिवार-रविवार वगळता हॉटेलमध्ये दुपारी ४पर्यंत ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीस परवानगी आहे. त्यानंतर होम डिलिव्हरी, पार्सल सुविधा सुरू ठेवता येईल. मुंबईतील करोना आटोक्यात येत असला तरीही चाचण्यांच्या प्रमाणातील पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नियमानुसार मुंबईचा समावेश तिसऱ्या गटात झाला आहे. त्याप्रमाणे मुंबईसाठी अटी लागू झाल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेतील महिलांना लोकलसूट
रेल्वे प्रवासाबाबत तिसऱ्या गटानुसार अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या महिला वर्गास अनुमती दिली आहे. त्याशिवाय लोकलमधील प्रवासासाठी राज्य सरकारनेही नियम लागू केले आहेत. ‘बेस्ट’मध्ये १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी असली तरीही त्यात उभ्याने प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खुले…बंद…
– सरकारी, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती. उत्पादने निर्यात होणाऱ्या लघु-मध्यम उद्योग, अत्यावश्यक सेवा, देशाच्या सुरक्षेशी संबधित उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम करण्यास परवानगी
– अन्य उद्योगांना ५० टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी. कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था संबंधित उद्योगांनी करणे आवश्यक
– बांधकामांसाठी कामगारांची उपस्थिती असल्यास किंवा बाहेरून कामगार आल्यास दुपारी ४पर्यंत कामांना परवानगी
– मैदानी खेळांसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ची वेळ
– सांस्कृतिक, सामाजिक करमणूक कार्यक्रमांसाठी ५० टक्के क्षमतेची अट. त्यासाठी संध्याकाळी ४पर्यंत अनुमती असतानाच शनिवार रविवार त्या कार्यक्रमांकावर निर्बंध कायम.
– लग्नसमारंभासाठी ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार. दोन तासांची अट रद्द
– व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा यांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी. त्यासाठी दुपारी ४पर्यंतच्या वेळेची मर्यादा. मात्र, एसीचा वापर न करण्याचे बंधन. ग्राहकांनी आगाऊ नोंदणी आवश्यक.
– ‘बायोबबल’मधील चित्रीकरण करता येणार. पण, संध्याकाळी ५नंतर फक्त इनडोअर शूटिंग
– सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रमांसाठी दुपारी ४पर्यंत ५० टक्के उपस्थिती
– अंत्ययात्रेत २० जणांच्या उपस्थितीस परवानगी