हायलाइट्स:
- आजीने बाळाच्या पोटावर दिले चटके
- अंधश्रद्धेतून घडला प्रकार
- आजीविरोधात गुन्हा दाखल
अमरावती (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
जिल्ह्यातील मेळघाटात दोन वर्षांच्या बालकाला अंधश्रद्धेतून पोटाला चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सदर बालकाची तब्बेत अद्यापही चिंताजनकच असून बाळावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशातच बाळाला चटके देणाऱ्या आजीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल रुग्णालयात जाऊन बाळाची विचारपूस केली होती. तसंच यशोमती ठाकूर यांनी बाळाला इजा करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बाळाला त्याच्या आजीनेच अंधश्रद्धेतून चटके दिल्याचे स्पष्ट झाल्याने चिखलदरा पोलिस ठाण्यात रात्री बाळाच्या आजीविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोना विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या खटकाली गावात राजरत्न जमुनकार या दोन वर्षीय बालकाची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे आजीने महिनाभरापूर्वी त्याच्या कानाला चटका दिला होता. त्यातही बाळाला बरं वाटत नसल्याने तिने बाळाच्या पोटावर चटके दिले. या प्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीन दिवसानंतरही बाळाच्या प्रकृतीत काही सुधारणा नाही, तर बाळाची आजी जासो गोंडान धांडेकर रा.खतकाली हिच्याविरुद्ध सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी केशव कंकाळ यांनी तक्रार दाखल केली. त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मेळघाटात सळईने चटके/स्थानिक डम्मा देणे ही पुरातन अघोरी प्रथा आहे, अशा अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी स्थानिक जनतेचे आरोग्य विषयक प्रबोधन, जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी अ.भा.अंनिस कार्यकर्ते प्रशासनाच्या मदतीला तत्पर आहेतच, असं अमरावती जिल्हा अंनिसचे जिल्हा सचिव हरिष केदार यांनी सांगितलं आहे.