अकोला : वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय सांप्रदाय आहे. माझी वारी माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत पायी दिंडी सोहळ्याला आम्ही फक्त वारकरी संघटनांचा पाठिंबा स्वीकारलेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि स्वीकारणार नाही असा निर्धार सर्व संघटनांच्यावतीने करण्यात आलेला आहे.
वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा किती शिस्तीमध्ये चालतो हे पाहण्याकरिता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले राजकीय जोडे बाजूला काढून वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन एक दिवसापुरते का होईना आमच्यासोबत पायी चालावे. आम्ही त्यांचे स्वागत करू असे यावेळी गणेश शेटे महाराज यांनी म्हटलं आहे.
पत्नीचे डागिने गहाण ठेवू पण पांडुरंगाच्या मंदिरावरील कळशाचे दर्शन घेवू
वारकरी संप्रदायाची पायी परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व वारकरी संघटना एकत्र आल्या आहोत. वारकऱ्यांना आतापर्यंत सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नसली तरी आम्ही आमच्या पत्नीचे डागिने गहाण ठेवू पण पांडुरंगाच्या मंदिरावरील कळशाचे दर्शन घेवू असा संकल्प वारकरी संप्रदायने केला आहे. यासंबंधीची माहिती विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेटे महाराज यांनी दिली आहे.
वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व वारकरी संघटना एकत्र
वारकरी संप्रदायाची पायी परंपरा खंडित होऊ नये म्हणून सर्व वारकरी संघटना एकत्र आलो आहोत. ज्ञानोबा, तुकोबा पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या दिंडी प्रमुखांचे फोन येत आहेत. आम्हाला माझी वारी माझी जबाबदारी या अभियानातील दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे. म्हणून सर्व संघटनांच्या सहमतीने प्रत्येक जिल्ह्यातील एक विणेकरी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वारकऱ्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्याकरिता सेवाभावी संघटना पुढे
पायी दिंडी सोहळ्यामध्ये ज्या कुठल्याही गावांमध्ये मुक्काम न करता गावाच्या बाहेर मुक्काम करून तिथे भोजनाची व्यवस्था करण्याचे नियोजन चालू आहे. पण वेळेवर नियोजन अवघड असल्यामुळे अनेक सेवाभावी संघटना पुढाकार घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्याकरता तत्पर असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक येथील अखिल विश्व वारकरी परिषद संस्थापक अध्यक्ष ह.भ.प श्री नितीन महाराज सातपुते यांनी दिंडी सोहळ्यासोबत रुग्णवाहिका व पाणी टँकरची व्यवस्था करून दिलेली आहे. इतरही बऱ्याच सेवाभावी संघटना स्वतःहून पुढाकार घेऊन वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पायी दिंडी सोहळ्यामध्ये कमतरता भासणार नाही हा आभास करून देत आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आषाढी पायी वारीची परंपरा पूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रचलित आहे. पण मागील वर्षी कोरोना संकटाच्यामुळे पायी वारी रद्द करून संतांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला पाठवण्यात आल्या आणि याही वर्षी वेळोवेळी सर्व वारकरी संघटनांनी सरकारला पत्र दिल्यानंतर आमच्या भावनेचा विचार न करता पायी वारी रद्द करून आपण मागील वर्षीप्रमाणे वाहनाने पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय दिलेला आहे.