मुंबई : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
आज महाराष्ट्रातील महाआघाडीच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांनी राजधानी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याचे फोटोही सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आले. याच फोटोचं अगदी दोन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वर्णन केलं आहे.
रोहित पवारांनी या बैठकीचा फोटो शेअर करत ‘लोकशाहीचं सौंदर्य!’ असं कॅप्शन या फोटोला दिला आहे. खरंतर, बैठक सुरू होताच मोदींकडून या बैठकीचा फोटो शेअर करण्यात आला. त्यानंतर अगदी १२ मिनिटांत मुख्यमंत्र्यांकडूनही फोटो शेअर करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ही एक अधिकृत बैठक होती. सगळे विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीबद्दल अधिक माहिती दिली.
या विषयांवर पंतप्रधान – मुख्यमंत्र्यांची चर्चा
मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पदोन्नतील आरक्षण, जीएसटी परतावा, कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता, पीक विमा, तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचे निकष बदलणे अशा विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शिवाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबाबतही पंतप्रधानांशी झालेल्या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
या भेटीत आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून दिले. तसंच आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.