
मुंबई – राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरू करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच कॉलेज सुरू करताना नियमावली तयार केली आहे. त्यानुसारच 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (13 ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.
उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकारणाशी चर्चा करुन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मोठ्या पद्धतीने लसीकरणाचे काम विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या प्रांगणात करावे. ज्या क्षेत्रात करोना असू शकतो, करोना कमी झाला किंवा करोना वाढू शकतो त्या क्षेत्रातले आयुक्त, महापालिका किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड 19 आजाराचा स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून विद्यापीठ आणि प्राधिकरणाने पुढचे निर्णय घ्यावे, असे त्यांनी सांगितल.
तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
[ad_2]