सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणजवळ नडगिवे घाटात रात्री दरड कोसळली. जेसीबीच्या साहाय्याने माती दगड बाजूला केले. मात्र, चिखल असल्याने वाहतूक एकेरी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा हायवे, नडगिवे गावाजवळ घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळून पूर्णतः रस्त्यावर आल्याने महामार्ग ठप्प झाला होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सागर खंडागळे याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर तत्काळ वीज मंडळ अधिकारी तसेच वैभववाडी, हायवे रोड ठेकेदार के सी सी कंपनीचा स्टाफ यांनी जेसीबीच्या साहाय्याने माती दगड बाजूला काढून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर केलं.
दरड कोसळल्यानंतर पावसाची संततधार सतत सुरू आहे. त्यामुळे चिखल झाला असून यामुळे रस्ते वाहतूक एक मार्गी सुरू केली आहे. तर अद्यापही दरड बाजुला करण्याचं काम सुरु असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज जारी करण्यात आला. इतकंच नाहीतर आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार आज रायगड आणि रत्नागिरीला मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी पावसाळ्यात 18 दिवस मोठ्या भरतीची शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटांची उंचीही 10 मीटरपर्यंत जाऊ शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.