पुणे: लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एका वाक्यात याचे उत्तर दिले आहे. आपल्या खोचक प्रतिक्रियेद्वारे उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार उदयनराजेंना टोला लगावला आहे. (dy cm ajit pawar coments on statement made by mp udayanraje bhosale)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहिले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी खासदार उदयनराजे यांच्या लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा अजित पवार आपल्या खास शैलीत म्हणाले, ‘त्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना?, आणि दुसरीकडं बोलणारेही लोकप्रतिनिधीच आहेत ना?’मराठा आरक्षण:
यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर देखील टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ‘विरोधकांचं सरकार न आल्यामुळं अजूनही त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय.’
पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राम मंदिरासाठी जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपवर देखील भाष्य केले. देशातील जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. इतका मोठा जर आरोप होत असेल, तर वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळले पाहिजे, असे पवार म्हणाले.