कोरोना विषाणू संसर्गाचा उद्भाव झाल्यापासून जगात अस्थिरतेचं वातावरण झालं आहे. कुठेही गेलात तरी असुरक्षिततेची भीती वाटत आहे. अशात बेघर असणाऱ्या किंवा दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांची परिस्थिती तर आणखी बिकट आहे. कोरोना विषाणूच्या संकट काळात आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोठंमोठ्या कंपन्या विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. शक्य असल्याच घरातून काम करण्याची मुभा दिली जात आहे. आरोग्यासंबंधित अडचणी निर्माण झाल्यास आर्थिक मदतही देऊ केली जात आहे.
अशातच पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळे बंधूनींही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूच्या संकट काळात आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित घर मिळावं या हेतूने नवीन इमारत उभारत आहेत. याची माहिती चितळे समुहाचे इंद्रनील चितळे यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. रविवारी इमारतीचं भूमिपूजन झाल्याची माहितीही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.
यावेळी इंद्रनील चिथळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘आमच्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पार पडला आहे. कोरोना संसर्गामुळे आपली संपूर्ण जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे आपल्याला कामाच्या पद्धतीत आणि रहिवासाच्या ठिकाणांत आधुनिक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही नवी इमारत असंख्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवासस्थान उपलब्ध करुन देईल, असा विश्वास इंद्रनील चितळे यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा- खडसेंची भाजपवर टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ते अजूनही आमचे नेते….’
या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध करुन देण्यात आली नाही. पण कोरोना संकटकाळात चितळे बंधुच्या या पुढाकाराचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक केलं जात आहे. इंद्रनील चितळे यांच्या ट्विटर अकाऊंटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.