यवतमाळ : मृगनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराज्याने पेरण्या उरकल्या. मात्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली तर आद्राच्या पावसानेसुध्दा दडी मारल्याने बळीराजा आसमानी संकटात सापडला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी वरूण राजाला प्रसन्न करन्यासाठी धोंड्या काढून धोंडी धोंडी पाणी दे ! म्हणत दारोदार भटकंती सूरू केली आहे.
कमरीला कडूलिंबाच्या फांद्या हातात मुसळ व त्याच्या मधोमध भलेमोठे बेडूक बांधून डफडीच्या तालावर नाचायचे आणी धोंडीधोंडी पाणी दे म्हणत गावात फेरी मारायची असा हा उपक्रम. ‘धोंडीचे दिवस पाणी मोठा दिवस, धोंडी आली दारात अन पाऊस आला जोरात’ असे लोकगीत म्हणून शेतकऱ्याची पोरं वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी धडपड करीत आहेत.
नागरिकही पाऊस येण्यासाठी धोंडीवर पाण्याचा वर्षाव करीत आहेत, असे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या दिग्रसमध्ये शेतकरी पुत्रांनी ही धोंडी काढली आहे.
अकोला जिल्ह्यामध्येही वाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने अनेकजण “भरभरून पाऊस बरसु दे आणि शेतकऱ्याच राण हिरवेगार होऊ दे” अशी आर्त हाक देवाला करीत आहेत. तर काहींनी धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वरुणराजाला साकडं घालत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून अवेळी व अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियायाणे व खताची जुळवाजुळव करून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र, पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली.
आता पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, वाडेगावसह परिसरात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे या करीता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडं घातलं जात आहे.