पुणे : धानोरीतील मायलेकराच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी संशयाची सुई असलेल्या बेपत्ता पतीचा मृतदेह खडकवासला जवळील खानापूर गावाजवळील नदीत आढळून आला आहे. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत कागदपत्रांमुळे ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, त्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
आबिद शेख वय ३५ असे मृत व्यक्तिचं नाव आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना करण्यात आली होती. या घटनेत आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले होते.
गेले काही दिवस पुणे शहर व ग्रामीण पोलीस आबिदचा शोध घेत होते. खानापूर येथे नदीत एक मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला होता. कागदपत्रावरून तो आबिद शेख यांचा तो मृतदेह असल्याचे लक्षात आले. याची माहिती मिळताच हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार पार्क करून रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये अबिद शेख कैद झाला होता. तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरू होता. आता आबिदचा मृतदेह आढळून आल्याने प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.