Home महाराष्ट्र राजगडाचा सिंहगड करू नका; दुर्गप्रेमींचे आवाहन

राजगडाचा सिंहगड करू नका; दुर्गप्रेमींचे आवाहन

0
राजगडाचा सिंहगड करू नका; दुर्गप्रेमींचे आवाहन

मुंबई: राजगडावर रोप वे बांधण्याच्या वृत्तानंतर शनिवारी आणि रविवारी दिवसभर दुर्गप्रेमींमध्ये राजगडाची चर्चा रंगली होती. रोप वे झाल्यानंतर राजगडावर येणारा ताण विचारात घेता राजगडाचा सिंहगड करू नका, असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे. यामुळे वाढणाऱ्या पर्यटनाच्या माध्यमातून राजगडाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा विचार करावा असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे.

ज्येष्ठ गिर्यारोहक उषःप्रभा पागे यांनी राजगडाची रचना लक्षात घेता या ठिकाणी रोप वे होऊ नये, असे मत नोंदवले. राजगडावर रोपवे झाल्यास तेथील निसर्गावर आक्रमण होण्याची शक्यता आहे. स्टॉल, दुकाने यांची संख्या वाढण्याची भीती आहे. यामुळे निसर्गात प्रचंड हस्तक्षेप होईल. ते टाळण्यासाठी काही जागा धाडसी लोकांसाठी असाव्यात, यामुळे तिथे माणसाच्या वावरावर नियंत्रण येईल, असे त्या म्हणाल्या. रायगडावर रोप वे झाला तेव्हाही त्याला विरोध झाला होता. आता किमान राजगडावर रोप वे होऊ नये, अशी अनेक दुर्गप्रेमींची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई आणि पुण्यातील सह्याद्रीप्रेमींचा ‘द ट्रॅश टॉक’ हा समूह गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सह्याद्रीमधील कचरा स्वच्छ करण्याचे काम करीत आहेत. या समूहाचे प्रमुख केदार पाटणकर यांनी राजगडावर रोप वे करताना लोकांना किल्ल्यावर जाण्यासाठी सोय हवी, असा मुद्दा उपस्थित केला जातो, असे सांगत आपल्याला वारसावास्तूंचे संवर्धन हा विषय शिकवला जात नाही याकडे लक्ष वेधले. गड-किल्ल्यांवर जाण्याची सोय करून दिली की, काय होते हे सिंहगड आणि इतर जागांवरून आपण शिकलो आहोत. वारसा नष्ट होतो आणि त्याची जागा गर्दी, दुकाने आणि भजी-वड्याने घेतली जाते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही जागेसाठी असा सोपा मार्ग उपलब्ध करून द्यायच्या आधी आपले समाजमन तिथे जायच्या पात्रतेचे करायला हवे, असे प्रातिनिधिक मत पाटणकर यांनी व्यक्त केले.

राजगडावर रोप वेसाठी सपाट जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी रोप वे बांधताना गडाचे नुकसान किती होईल हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. रायगड, पन्हाळा, सिंहगड येथे मोठ्या प्रमाणात लोक येतात. या गडांची माणसांना सामावून घेण्याची क्षमता किती आहे याचा अभ्यास व्हायला हवा. यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या दुकानांना, स्टॉलना यामुळे चालना मिळते. त्यामुळे यावरही नियंत्रण कसे ठेवता येईल याचे निकष आखले जायला हवेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा सरकारी पातळीवर उपस्थित केला जातो, तेव्हा यामध्ये कुठेही प्रस्तावित प्रकल्पांचा मुद्दा येत नाही. रोप वेसारख्या गोष्टींना व्यापक विरोध होणार याचा अंदाज असल्याने याबद्दल माहिती दिली जात नाही, अशी चर्चा दिवसभर या निमित्ताने रंगली होती.

किल्ल्याचे दुर्गमत्व टिकले पाहिजे. ते सहलीचे ठिकाण व्हायला नको. गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृहे, राहण्याचे ठिकाण याच्या सोयी व्हायला हव्यात. ज्या ठिकाणी लोकांना पोहोचता येईल, असे मार्ग योग्यरित्या जपले पाहिजेत.

– राजेश गाडगीळ, गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here