Home महाराष्ट्र कोकण कोकणातील पूरग्रस्तांना मोफत घरे आणि केंद्राकडून सगळी मदत – देवेंद्र फडणवीस

कोकणातील पूरग्रस्तांना मोफत घरे आणि केंद्राकडून सगळी मदत – देवेंद्र फडणवीस

0

कोकणातील पूरग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे बांधून देण्यात येतील तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिले. तळीये गावाला फडणवीस, राणे आणि प्रवीण दरेकर यांनी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

या तीनही नेत्यांनी अनेक ग्रामस्थांशी यावेळी संवाद साधला. पूरग्रस्त नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे फडणवीस आणि राणे यांनी स्पष्ट केले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहून गेले आहेत. अनेक गावांमध्ये झालेले नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आज लोकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला. कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळीये या गावांतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत केला. माझे सहकारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा सोबत होते.या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.
एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here