सांगली – राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबामधील सुमारे 1 लाख 97 हजार लोक विस्थापीत झाले आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी शासन कटिबध्द असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे.
तोक्ते, निसर्ग चक्रीवादळ अशा संकट काळात एनडीआरएफच्या प्रचलित नियमांपेक्षाही जास्त राज्य शासनाने भरपाई दिली आहे. त्याचप्रमाणे या अतिवृष्टी व महापूराच्या नुकसानीच्या वेळीही भरपाई देताना राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. आपली जबाबदारी पार पाडण्यात राज्य शासन तसुभरही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.