सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपासून धो-धो पाऊस बरसत असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी शिरले असून बुधवारी रात्रीही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नदीकिनारी वसलेल्या भागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ( Sindhudurg Rains Latest Update )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. वसोली, उपवडे, दुकानवाड, शिवापूर या गावांचा बुधवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्त्यावर झाडे पडून वाहतूक काही काळ विस्कळीत होण्याचे प्रकार घडले आहेत. कणकवली येथे रामेश्वर प्लाझा या इमारतीत पाणी शिरले. दोडामार्ग तालुक्यातील तेरेखोल नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.
जिल्ह्यातील पावसाच्या नोंदीनुसार बुधवारी सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात झाला. सावंतवाडीत १७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कुडाळ येथे ९२, दोडामार्ग येथे ११८, वैभववाडी येथे १५६, वेंगुर्ला येथे १२८, देवगड येथे १५० मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील तीन ते चार दिवस कोकणात मुसळधार
हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच गोव्यामध्ये पुढील तीन ते चार तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून मुबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.