Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठाला ‘हा’ इशारा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठाला ‘हा’ इशारा

0

पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाने स्वत: झाडे लावून, पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्क उभे करून त्यासाठी शुल्क आकारावे. विद्यापीठात वर्षानुवर्षे असलेल्या वृक्षसंपदेला ऑक्सीपार्कचे नाव देऊन नागरिकांकडून पैसे घेणे योग्य नाही, अशा शब्दांमध्ये रविवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला फटकारले. विद्यापीठात येणाऱ्या सामान्य नागरिकांना माझा पाठिंबा असून त्यासाठी कोणाचाही रोष पत्करायला तयार असल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले.

काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सीपार्क’ या उपक्रमाअंतर्गत सावित्राबाई फुले, पुणे विद्यापीठाने विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर उदय सामंत यांनी मध्यस्थी करत निर्णयाला स्थगिती दिली. रविवारी एका बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आले असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. ‘विद्यापीठात असलेली झाडे आणि निसर्गसौंदर्य वर्षानुवर्षे तसेच आहे. त्यासाठी विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारणे गैर आहे. माझे विद्यापीठाच्या प्रशासनाशी कोणतेही वाद नाहीत’ मात्र, जे चूक आहे त्याला पाठिशी घालता येणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने याऊलट स्वत:चे पैसे खर्च करून एक उत्तम ऑक्सीपार्क उभारावे, त्याचे शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सामंत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘ऑक्सीपार्क’ चा प्रकल्प बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यामुळे विद्यापीठात वर्षानुवर्षे फिरायला आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना विनाशुल्क फिरता येणार आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.

काय आहे ‘ऑक्सीपार्क’ प्रकल्प

पुणे विद्यापीठातील वृक्षसंपदा, निसर्ग आणि पंक्षीसंचार यासाठी ‘ऑक्सीपार्क’ प्रकल्प जाहीर केला. या निसर्गसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांकडून शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. नागरिकांकडून दरमहा एक हजार रुपये, सहामाही शुल्क भरल्यास ५,५०० रुपये तर वर्षभराचे शुल्क भरल्यास १० हजार रुपये आकारले जाणार होते. शुल्क भरणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र दिले जाणार होते. याशिवाय विद्यापीठातील ओपन जिम, मोफत वाहनतळ, अशा काही सुविधाही दिल्या जाणार होत्या.

ऑक्सीपार्कसाठी विद्यापीठाने पैसे आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक नागरिकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी माझ्याशी संवाद साधला. त्यावर तातडीने कार्यवाही करत ऑक्सीपार्कच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाने स्वतःचे पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्कची निर्मिती करावी आणि मग नागरिकांकडून खुशाल शुल्क वसूल करावे, असेही सामंत यांनी सांगितले आहे.

‘ऑक्सीपार्क’चा विवाद समोर आल्यानंतर मला अनेक स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे फोन आले. त्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. सावित्राबाई फुले, पुणे विद्यापीठात वर्षानुवर्षे असलेल्या वृक्षसंपदेचा सामान्य नागरिकांनाही फायदा व्हायला हवा. त्यासाठी शुल्क आकारणे मला योग्य वाटत नाही.

उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here