नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातल्यानंतर तिसऱ्या लाटेत (Coronavirus Third Wave) लहान मुलांना संसर्गाची जोखीम राहील, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे राहतील. ५ ते ७ टक्के मुलांना मध्यम लक्षणे आणि उर्वरित ३ टक्के मुलांना सिव्हियर जोखीम राहील, असंही निरीक्षणातून लक्षात आलं आहे. वैद्यकीय परिभाषेत याला सिव्हियर म्हणजे मल्टिसिस्टम इन्फ्लेमेंटरी सिंड्रोम म्हणतात, अशी माहिती ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन यांनी बुधवारी दिली आहे.
मेडिकलमध्ये सध्या एमआयएसची लक्षणे आढळलेल्या १० बालकांवर सध्या पेडियाट्रिक कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेतील संभाव्य शक्यता मांडताना डॉ. जैन म्हणाल्या, घरातल्या लहान मुलांना चार दिवसांपेक्षा अधिक ताप असेल, डोळे लाल दिसत असतील, पातळ संडास होत असेल, मुलं सुस्त पडलं असेल, चट्टे येणे, उलटी होणे, चव- वास जाणे अशी लक्षणे दिसली तर पालकांनी ताबडतोब डॉक्टरशी संपर्क साधावा.
यातील ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे राहण्याची शक्यता आहे. अशा मुलांची आरटीपीसीआर चाचणी केली तरी त्यांचा अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो. मात्र त्यानंतर मुलांना एमआयएस अर्थात मल्टिसिस्टिम इन्फ्लेमेंटरी सिंड्रोमची लक्षणे दिसू शकतात. शिवाय अशा मुलांच्या घरातही कोणाला तरी करोना विषाणूची लागण होऊन गेली असेल तरंच त्यांना अशी लक्षणे दिसू शकतात.
गेल्या वर्षभरात आतापर्यंत मेडिकलमध्ये एमआयएसची लक्षणे असलेल्या ३५ बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्यातील एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही. त्यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेत संभाव्य जोखीम असली तरी पालकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण सौम्य लक्षणे असल्याने मुलांना जीवाची जोखीम तुलनेत कमी असेल, असंही डॉ. जैन यांनी स्पष्ट केलं.