कोल्हापूर: पोलिस हवालदार असलेल्या सूनेने घरगुती वादातून थेट सासूलाच पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू जखमी झाली असून हवालदार संगीता राजेंद्र वराळे हिला अटक करण्यात आली आहे. कसबा बावडा येथे मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (in a domestic dispute daughter in law tried to finish the life of her mother in law)
याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता वराळे या कोल्हापूर पोलिस मुख्यालयात नोकरीला आहेत. त्या आपल्या सासूसोबत बावडा येथील आंबेडकर वसाहत येथे राहतात. त्यांच्यात व सासू आशालता श्रीपती वराळे यांच्यात सतत वाद होत होते. कौटुंबिक कारणावरून सतत होणारा हा वाद सोमवारी मध्यरात्री एक वाजता उफाळून आला. यामुळे चिडलेल्या सूनेने सासूच्या तोंडावर रॉकेल व डिझेल फेकले. त्यानंतर कागदाचा पेटता बोळा त्यांच्या दिशेने फेकला.
अंगावर पडलेल्या पेट्रोलमुळे आणि त्यावर कागदाचा बोळा फेकल्याने कपड्याने पेट घेतला. यात आशालता यांच्या तोंडाला व मानेला भाजल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सून वराळे हिला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व पोलिस निरीक्षक कटकधोंड यांनी भेट दिली.