Home महाराष्ट्र आयपीएल सट्टाबाजीचे पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट

आयपीएल सट्टाबाजीचे पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट

0
आयपीएल सट्टाबाजीचे पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट

पुणे –आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारे पुण्यातील एक मोठे रॅकेट पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले. या रॅकेटचे दुबईतील सट्टा रॅकेटशी कनेक्‍शन असल्याचा संशय असून या प्रकरणात शहरातील अन्य काही बड्या हस्ती जाळ्यात सापडण्याची शक्‍यता आहे.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल 93 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून आणखी एक मोठा मासा, मोठी रक्‍कम घेऊन पळून गेल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनाच माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

या सट्ट्यातून मिळणारा पैसा आरोपींनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्याचे तपासात समोर येत असून त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

मागील वर्षीच्या आयपीएलपासून या सट्टेबाजांच्या हालचालीवर पोलीस नजर ठेऊन होते. समर्थ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा. रास्ता पेठ, पुणे) आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र तावरे यांनी फिर्याद दिली. आयुक्त गुप्ता यांना आयपीएल मॅचवर पुण्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी क्रिकेट बेटिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रास्ता पेठेतील त्रिमूर्ती सोसायटी येथे गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत सट्टा रॅकेट उघडकीस आणले. अबुधाबी येथे शेख जईद स्टेडियममध्ये सुरु असलेल्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी वापरत असलेल्या मोबाईलमधील सीमकार्ड बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मिळवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 92 लाख रुपये रोख 65 हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन, नोटा मोजण्याचे मशीन व जुगाराचे साहित्य असा एकूण 92 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त(परिमंडळ 1) डॉ.प्रियंका नारनवरे, उपायुक्त(आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मार्केटयार्डमध्येही बेटिंगवर कारवाई

मार्केटयार्ड परिसरात क्रिकेट बेटिंग घेताना अशोक भवरलाल जैन (वय 48) याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये 51 हजार 700 रुपयांची रोकड होती. आरोपी अशोक जैन याचा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्री व्यवसाय तर गणेश भुतडा याचा बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन व्यवसाय आहे.

फरार बुकीच्या “ललित’कथा

आणखी एक बुकी फरार आहे. त्याचा हवाला रॅकेटशी संबंध असल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहरातील अनेक बेकायदा व्यवसायांत त्याचा सहभाग असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीनी क्रिप्टो करन्सीमध्ये ही गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अनेक “ललीत’ कथा गुन्हेगारी वर्तुळात चर्चिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here