मुंबई:अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक भागांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत. ( Jayant Patil On Almatti Dam Water Issue )
जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना सोबत घेऊन ही चर्चा केली जाणार आहे. ही चर्चा थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
‘ कृष्णा नदी ‘चा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. यात कमीत कमी नुकसान कसं होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर बैठक होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल, हा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.