खडकवासला ते फुरसुंगी (Khadakwasla to Fursungi) दरम्यान असलेला 28 किमीचा कालवा भूमिगत करण्याचा (underground canal project) विचार मागील काही दिवसांपासून सुरू होता. पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या प्रकल्पाला मंजूरी न दिल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे. संबंधित कालवा भूमिगत केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतील हजारो हेक्टर जागा रिक्त होईल. ज्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकतो, त्यातून मोठा निधी उभारून भूमिगत कालव्याचा खर्च भागवता येईल, अशी ही योजना होती.
खरंतर, खडवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान 28 किमीचा कालवा आहे. हा कालवा ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या कालव्याने पुण्यातील बरीच जागा व्यापली आहे. त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्याचा विचार केला जात होता. हा कालवा भूमिगत करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचबरोबर कालवा भूमिगत केल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला, तर त्यातून जवळपास 20 हजार कोटींचा निधी उभारला जाऊ शकतो.
त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्यासाठीचा खर्च पालिकेला आपल्या खिशातून करावा लागणार नव्हता. त्याचबरोबर हा कालवा भूमिगत केल्यामुळे बाष्पीभवन होऊन वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचेल. हेच पाणी पीएमआरडीएला उपलब्ध करून देता येऊ शकतं, असंही जलसंपदा विभागाचे आयोजन होतं. त्यासाठी या प्रकल्पाबाबतचा सविस्तर अहवाल PMRDA ने तयार करावा अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला होती. पण PMRDA ने या प्रकल्पाला नकार दिल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे.