व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ‘या’ शहरात करोनाचे निर्बंध शिथिल; नागरिकांची वर्दळ वाढली

0
100

कोल्हापूर : तब्बल ९० दिवसानंतर कोल्हापूर शहर अनलॉक झाले. सरसकट सर्व दुकाने उघडल्याने रस्त्यावर आणि दुकानांतील वर्दळ वाढली. परिणामी शहर गजबजून गेले. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने नमती भूमिका पाच दिवसांसाठी निर्बंध उठवले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन महिने करोनाचं थैमान सुरू आहे. पॉझिटिव्हिटी दर १५ ते १६ टक्के असल्याने जिल्ह्यातील निर्बंध वाढविण्यात आले होते. पण, तीन महिने दुकाने बंद असल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारचा निर्णय काहीही होवो, दुकाने उघडणारच अशी भूमिका घेतली होती. यामुळे सरकारने नमते घेत पाच दिवसांसाठी निर्बंध शिथिल केले.

९० दिवसानंतर शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली. महाव्दार, ताराबाई, भाऊसिंगजी रोड, शाहुपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीसह सर्व भागातील दुकाने उघडल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी जिल्ह्यातील निर्बंध मात्र कायम आहेत.

सरकारने पाच दिवसासाठी म्हणजे ९ जुलैपर्यंत निर्बंध उठवले आहेत. पाच दिवसात करोना संसर्गाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

लॉकडाऊनचे अन्यायी निर्बंध शिथिल करून तीन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व्यापार सुरू करण्यास मिळालेली परवानगी कायम रहावी यासाठी व्यापारी व ग्राहक दोन्ही घटक स्वयंशिस्त पाळतील व व्यापार कायम सुरू ठेवतील असा विश्‍वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष व राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील व्यापार सुरू करण्यास प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच असा निर्धार केलेल्या ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’तर्फे आज आंदोलनाऐवजी आनंदोत्सव साजरा केला व करोना प्रतिबंधक उपायांची माहिती देण्यासाठी रॅलीचे आयोजन केले.

जनता बझार चौकात असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सेक्रेटरी रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानीस अनिल पिंजाणी संचालक माणिक पाटील-चुयेकर, स्नेहल मगदुम, दिपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, शाम बासराणी, युवराज राणिंगा, मनोज शहा यांच्यासह विविध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजारामपुरीतील महिला उद्योजिका सौ. रक्षा राऊत यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी असोसिएशनतर्फे ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ या अभियानाचे स्टिकर्स व बॅनर्स व्यापार्‍यांना वितरीत करण्यात आले व रॅलीद्वारे करोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळण्याकामी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील, आम. चंद्रकांत जाधव, जिल्हापोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त व प्रभारी जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे तसेच व्यापार्‍यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडून दबाव ठेवण्यात सहकार्य केलेली सर्व प्रसारमाध्यमे यांना धन्यवाद दिले. तसेच तीन महिन्याच्या लॉकडाऊनसह वर्षभरातील निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या व्यापार्‍यांना मदतीसाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे सांगितले.

दरम्यान, सभेनंतर व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले व पुढील उपाययोजनांबद्दल सविस्तर चर्चा केली.

Source link