कोल्हापूर : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
गोकुळ दूध संघात अनेक वर्षानंतर सत्तांतर झालं असून सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात महाडिक गटाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथे पत्रकार परिषदेत घेत काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटावर जोरदार हल्लाबोल केला.
‘उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखा हुकूमशाही पद्धतीचा कारभार यापूर्वी गोकुळमध्ये सुरू होता,’ अशा शब्दांमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तोफ डागली.
गोकुळच्या निवडणुकीत दुधाच्या टँकरवरुन पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सोमवारी, गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प येथे अमृत कलश पूजन सोहळा झाला. यानिमित्ताने तब्बल वीस वर्षानंतर मंत्री मुश्रीफ व पाटील यांनी गोकुळच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोघांनीही महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली.
‘एकट्या महादेवराव महाडिक यांच्या व्यंकटेश्वरा गुड मुव्हर्सचे गेल्या दहा वर्षात दुधाच्या टँकरचे बिल १३४ कोटी ७० लाख इतके आहे. दहा वर्षात इतके टँकरचे बिल तर गेल्या तीस वर्षात किती बिल निघाले असेल? यावरुन गोकुळमध्ये त्यांचा नेमका स्वार्थ कशात होता हे समोर येते,’ असा खोचक टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘मुंबईमध्ये दुधाची विक्री कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेज या संस्थेमार्फत होते. प्रति दिन दुधाची विक्री ३७ हजार लिटर होते. प्रतिलिटर दोन रुपये ४५ पैसे कमिशन कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजला मिळते. त्यानुसार प्रतिदिन ९०, ६५० रुपये तर प्रति महिन्याला २७ लाख १९ हजार ५०० रुपये कमिशन होते. एका वर्षाला कमिशनची रक्कम तीन कोटी २६ लाख ३४ हजार इतकी आहे. गेल्या दहा वर्षातील ही रक्कम ४८ कोटी ९५ लाख दहा हजार रुपये इतकी आहे.’
‘३ मंत्री मिळून प्रयत्न करणार’
‘गोकुळशी निगडीत सरकारी पातळीवर जे प्रस्ताव, अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जिल्ह्यातील आम्ही तिघे मंत्री एकत्रित प्रयत्न करणार आहोत. तसेच राष्ट्रीय कृषी योजनेतून गोकुळला ५० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हे अनुदान गेली तीन वर्ष थकीत आहे. हे अनुदान लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
मुश्रीफांचा घणाघात
‘गेल्या दीड वर्षात २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा होता. मात्र त्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून प्रशिक्षणाचा कालावधी दोन महिन्यावर आणला. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याऐवजी त्या मंडळींनी मनमानी पद्धतीने कामकाज केले. २० लाख लिटर दूध संकलन करायचे म्हणून कर्ज काढले. नोकर भरती केली. नोकरावरील खर्च १३० कोटी रुपये होतो. वारणा, कृष्णा संगमनेरसह अन्य दूध संघाच्या पाच लाख लिटर दूध संकलनाच्या प्रकल्पावरील नोकरांचा पगार हा २० कोटीच्या आसपास आहे आणि गोकुळ दूध संघातील पगाराची रक्कम १३० कोटीवर गेली आहे. यापूर्वीच्या नेते मंडळींना दूध उत्पादकांनी भरपूर संधी दिली होती, त्यांनी सभासदाभिमुख कारभार करण्याची गरज होती. चुकीच्या कारभाराबद्दल यापूर्वीच्या मंडळींना लाज वाटायला पाहिजे होती. वेळीच बदल झाला नसता तर गोकुळचा पांढरा हत्ती झाला असता,’ असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटावर जोरदार शाब्दिक हल्ला केला.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, संचालक व माजी आमदार सुजित मिणचेकर, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, अंजना रेडेकर, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, प्रकाश पाटील, रणजितसिंह पाटील, नाविद मुश्रीफ, अमरसिंह पाटील, अजित नरके, एस. आर. पाटील, बाबासाहेब चौगुले आदी उपस्थित होते.