Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांच्या तालुक्यात भाजपला धक्का; एकमेव सदस्याचा शिवसेना प्रवेश

चंद्रकांत पाटलांच्या तालुक्यात भाजपला धक्का; एकमेव सदस्याचा शिवसेना प्रवेश

0
चंद्रकांत पाटलांच्या तालुक्यात भाजपला धक्का; एकमेव सदस्याचा शिवसेना प्रवेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची गृहजिल्हा असलेल्या कोल्हापूरमध्येच राजकीय पकड नसल्याची टीका वारंवार होते. अशातच आता चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या भुदरगड तालुक्यातच मोठा धक्का बसला आहे. कारण या तालुक्यातील भाजपच्या एकमेव पंचायत समिती सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य आक्काताई प्रवीण नलावडे यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत नलावडे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करत भाजपला धक्का दिला. भुदरगड तालुक्यातील त्या भाजपच्या एकमेव सदस्य होत्या.

ग्रामपंचायतीतही भाजपचा उडाला होता धुव्वा!

शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव केला होता. भाजपच्या विरोधात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघेही एकत्र आले होते. त्यानंतर आता पंचायत समितीतही सेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नलावडे यांना सेनेत घेऊन त्यांना पंचायत समितीचे सभापतीपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष ज्या तालुक्यातील आहेत त्या तालुक्यात भाजपचे पंख छाटण्याचे काम शिवसेना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती सदस्याच्या पक्ष प्रवेश मानला जात आहे. नलावडे यांच्या पक्षप्रवेशाला नंदकुमार ढेंगे, दत्ताजी उगळे, कल्याणराव निकम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर

राज्यातील भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रकांत पाटील हे सर्वाधिक ताकदवान नेते मानले जातात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या अभावावरून त्यांना कायमच विरोधकांकडून लक्ष्य केलं जातं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात दारुण पराभव झाला होता. तसंच या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधून न लढता पुण्यातून निवडणूक लढवल्याने त्यांनी मैदानातून पळ काढल्याची टीका त्यांच्यावर वारंवार होते. अशातच आता पुन्हा एकदा भाजपला चंद्रकांत पाटील यांच्या तालुक्यातच धक्का बसला असून शिवसेनेच्या या खेळीला चंद्रकांत पाटील कसं प्रत्युत्तर देतात, हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here