कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत असताना शेजारच्या कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्हिटी दर तर तब्बल १५.९५ असून हा दर राज्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात महिनाभर रोज दीड हजारापर्यंत करोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता कायम आहे. ( Kolhapur Covid Positivity Rate Update )
मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात करोनाचा कहर कायम आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात हा कहर अधिक आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत करोना मृत्यूदरही अधिक आहे. तीन ते साडे तीन टक्के हा दर आहे. याशिवाय पॉझिटिव्हिटी दर तर राज्यात सर्वाधिक आहे. गेल्या काही दिवसांत हा दर तेरा ते सोळा टक्केपर्यंत स्थिर आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी आठवडाभराचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर जाहीर केला. त्यामध्ये कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर १५.९५ टक्के तर सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.३३ टक्के आहे. या तुलनेत सांगलीचा दर कमी झाला असून तो ६.७७ आहे. या तीनही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत बारा हजार जणांचा करोनाने बळी घेतला आहे. चार लाखांवर लोकांना करोनाने आपल्या विळख्यात घेतले होते पण त्यातून सुटका करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
कोल्हापूर करोना स्थिती
शुक्रवारचे रुग्ण- १८५५
शुक्रवारी झालेले मृत्यू- २९
उपचार घेत असलेले रुग्ण- १२५००