
[ad_1]
प्रसेनजीत पाटील हे कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
प्रसेनजीत पाटील स्वगृही परतल्यानं बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखी एक जागा भक्कम झाली आहे, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी यावेळी केलं. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभं राहावं,’ असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
‘प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बदलत असते. आपण जिद्द सोडायची नसते. आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे, अशा जोमाने कामाला सुरुवात करा,’ असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.