अकोला:अकोला जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लावले होते. करोना रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरत असल्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत आज माहिती दिली. ( Akola District Unlock Guidelines )
अनलॉक प्रक्रिया सुरू होत असताना नवीन नियमानुसार सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि भोजनालय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क, सायकलिंग करण्यासाठी नियमित मुभा देण्यात आली आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे. लग्न समारंभांकरिता मंगल कार्यालयामध्ये वधू-वरासह एकूण क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० पेक्षा कमी लोकांची उपस्थिती असावी, असे नमूद करण्यात आले आहे.
अंत्यसंस्काराला ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठी पूर्णत: सूट देण्यात आली आहे तसेच लेवल ५ मधून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांकडे ई-पास असणे अनिवार्य राहील.
नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. करोना संसर्गाला पूर्णपणे हरवण्यासाठी शासनाने दिलेल्या पंचसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन टाळेबंदी शिथील करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. हे आदेश सोमवारी सकाळी ७ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.