
मुंबई, 18 जून: उत्तरेकडे मॉन्सूनने कूच केल्यानंतर राज्यातील (Maharashtra Rain) बहुतांशी भागात बदल होत आहे. कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी मेघगर्नजेसह जोरदार (Heavy Rainfall)पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप असून तापमानात काहीशी वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर गेली असून जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी साचलं आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात पावसाचं धुमशान, 59 बंधारे पाण्याखाली @News18lokmat pic.twitter.com/cbvOzAU63f
— News18Lokmat (@News18lokmat) June 18, 2021
पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे शहरात मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. काल दिवसभरात अवघ्या 12 ते 13 मिमी पावसाची नोंद झालीय.तसंच आज सकाळीही लख्ख ऊन पडलं आहे.
कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. धरणातून पायथा विद्युत गृहातून 2100 क्यूसेक ने होणार पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काही अंशी कमी झाला असला तरीही जिल्ह्यातील दापोली , मंडणगड , लांजा , राजापूर तालुक्यात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरीही जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. पुढील 48 तास जिल्ह्यासाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात सध्या कुठेही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नसली तरीही नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे समुद्रकिनारी, नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच नद्या आवाक्यात आहेत. त्यामुळे जिल्हावासियांना सध्यातरी मोठा दिलासा मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.03 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच अलिबाग- 104.00 मि.मी., मुरुड- 99.00 मि.मी., पनवेल- 52.60 मि.मी., उरण-78.00 मि.मी., कर्जत- 20.40 मि.मी., माणगाव- 101.00 मि.मी., रोहा- 53.00 मि.मी., सुधागड-52.00 मि.मी., तळा- 84.00 मि.मी., महाड- 67.00 मि.मी., पोलादपूर- 78.00 मि.मी, म्हसळा- 81.00 मि.मी., श्रीवर्धन- 100.00 मि.मी., माथेरान- 36.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 56.40 मि.मी. इतके झाले आहे.