हायलाइट्स:
- पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी
- पॉझिटिव्हिटी दर, ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेआधारे वर्गीकरण
- मुंबई-ठाण्यात लोकलप्रतीक्षा कायम
उद्या, सोमवारपासून नवी नियमावली लागू
मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
करोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून उद्या, सोमवार ७ जूनपासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी होईल. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या आधारावरच हे निर्बंध शिथील करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच गट निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी लग्न करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मात्र मुंबई आणि ठाणे हे तिसऱ्या गटात असल्याने मुंबई-ठाण्याला लोकलची प्रतीक्षा कायम आहे.
ज्यात करोनाला काही प्रमाणात आळा घालण्यात यश येत असल्यामुळेच काही निर्बंधात आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतची नवीन नियमावली शुक्रवारी मध्यरात्री मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जाहीर केली. निर्बंधांबाबत गेल्या दोन दिवसांपूर्वी सरकारमधील गोंधळ पुढे आला होता. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नियम शिथिल करण्याबाबत घोषणा केली होती. पण त्यानंतर काहीच तासात मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र आता अधिकृत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ, तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच गटांत वर्गीकरण
पहिला गट –
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन खाटा २५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी भरलेल्या.
या गटात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल
दुसरा गट
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि ऑक्सिजन खाटा २५ टक्के ते ४० टक्के भरलेल्या असे जिल्हे.
मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट
तिसरा गट
पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के ते १० टक्के आणि ऑक्सिजन खाटा ४० टक्क्यांहून अधिक भरलेल्या.
दुकाने दु. ४ पर्यंत सुरू राहतील.
सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.
चौथा गट
पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के आणि ऑक्सिजन खाटा ६० टक्के भरलेले जिल्हे.
सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दु. ४ पर्यंत सुरू राहतील.
अन्य दुकाने बंद राहतील.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांहून अधिक आणि ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दु. ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.
लग्नसोहळ्याचे निर्बंध शिथील
वर्गीकरणानुसार पहिल्या गटात लग्न सोहळ्यास कोणतेही बंधने नसतील. दुसऱ्या गटात हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. तिसऱ्या गटात ५०, तर चौथ्या गटात केवळ २५ जणांना उपस्थितीची मर्यादा.
अंत्यविधीसाठी नियम
अंत्यविधीसाठी पहिल्या दोन गटांत कोणतीही बंधने नाहीत. तिसऱ्या, चौथ्या गटात उपस्थितीला २० जणांची मर्यादा. पाचव्या टप्प्यात सर्व निर्बंध कायम असतील.
असे आहेत पाच गट
पहिला गट- ठाणे, नगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, वर्धा.
दुसरा गट- पालघर, औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी.
तिसरा गट- मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ.
चौथा गट- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली
पाचवा गट- कोल्हापूर