Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विनायक मेटेंनी केला घणाघाती आरोप

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विनायक मेटेंनी केला घणाघाती आरोप

0
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विनायक मेटेंनी केला घणाघाती आरोप

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र या भेटीबाबत शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Criticizes Thackeray Government) यांनी वेगळाच आरोप केला आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यांनी खरंतर मराठा आरक्षणाचा कांगावा करत अन्य सतरा प्रश्नही यावेळी पुढे रेटले आहेत,’ असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

सत्ताधाऱ्यांच्या या दिल्लीभेटीचे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने फलित काय झाले, हे जाहीर करावे, अशी मागणीही मेटे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील रणनीती काय?

विनायक मेटे शनिवारी नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मेटे म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधात निकाल दिल्याने समाज सैरभैर झालेला आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळे विषय हाती घेतलेले आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून पुढे कशा पद्धतीने संघर्ष करायचा, याचा निर्णय घेणार आहोत. त्यासोबतच राज्य सरकारच्या हातात असलेल्या सवलती मिळाव्यात यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता मोर्चे काढणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री तसेच मंत्री दिल्लीला जाऊन आले. वास्तविक पाहता यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातो, असे सांगितले. मात्र ते अन्य सतरा विषय घेऊन गेले. एक प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा करीत अन्य विषय त्यांनी रेटले आहेत. तुम्ही दिल्लीत गेला मग काय झाले, हे जनतेला जाहीरपणे सांगा.’ असं आव्हान त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, ‘आगामी काळात कायदेशीर लढाई, समाजमध्ये जागृती, विधिमंडळात संघर्ष अशी भूमिका आमच्या पक्षाने घेतली आहे. येत्या काळामध्ये जर सरकारने ठोस भूमिका जाहीर केली नाही, तर पावसाळी अधिवेशन आम्ही चालू देणार नाही. जे मराठा नेते आमदार प्रत्येक पक्षांमध्ये आहेत, त्यांनी गांभीर्याने घ्यावे. पाच जुलैपर्यंत निर्णय घेतला नाही, तर अधिवेशन चालू देऊ नका. तुम्ही समाजाबरोबर नुसतेच बाहेर नाही तर सभागृहामध्येही एकच राहा, आंदोलन करा,’ असंही मेटे म्हणाले.

संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी काय म्हणाले मेटे?

‘देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांचे योगदान होते, तसंच आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा व समाजाचा प्रश्न हा स्वातंत्र्याच्या सारखाच ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे त्याचे नेतृत्व एकानेच काय अनेकांनी करावे. त्यामुळे आमच्यामध्ये कोणतीही मतभिन्नता नाही. त्यातून समाजाचे नुकसानही होत नाही. जो तो आपापल्या मार्गाने आंदोलन करत आहे. आमचे ध्येय समाजाला आरक्षण मिळावे एवढेच आहे,’ असं म्हणत विनायक मेटे यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here